श्री समर्थ मालिक – यात काही कमी नाही, रिते नाही, पण सेवेकरी ओळखणारा पाहिजे. प्रकृतीचे खेळ आहेत. ते अतोनात चंचलयुक्त असतात अन् म्हणून ते भिन्न आहे. ज्या वेळेला प्रकृती अभिन्न होईल, त्याच वेळेला सद्गुरु व त्यांची लिला याची गती मिळेल.
मी सर्व भूतेषु पश्य आहे असे निवेदन आहे आणि असे काही सेवेकऱ्यांच्या आढळण्यात आले असेल. प्रकृती स्वयमेव आहे, प्रकृती जन्म धारण करते असे आढळले आहे का? मग अनंत रूपे, अनंत नामे असे जे म्हटले आहे, ते कोण नटले आहे?
मला नाही चरण, नाही नाक, नाही कान, नाही डोळे, नाही तोंड पण बोलतो. फार सुंदर पाय नाहीत, पण चालतो. मी सर्वव्यापी आहे. स्थूल देही आहेत, त्या स्थूलाचे व्यवहार कोणाच्या सत्तेने चालतात? जर सद्गुरु कृपेने सर्व चालते, मग तुझे माझे का होते? म्हणून जोपर्यंत अज्ञानपणा जात नाही, तोपर्यंत सद्गुरु चरण तीर्थ प्रगटणार नाही.
सेवेकरी म्हणतात ही प्रकृती आहे, पण ती कोणाच्या आधीन आहे? ती कोणाच्या स्वाधीन आहे? ती प्रकृती केव्हा फेकून देतील याचा थांगपत्ताही लागू देणार नाहीत. ते बाहेर केव्हा पडतील, हे कुणीही सांगू शकत नाही. ती प्रकृती चांगली असल्यास, ती राहण्याकरता मानव वैद्यकीय उपचार करतात, पण बाहेर पडावयाचे असेल तर औषधोपचार करूनही ते बाहेर पडतातच नां? मग नाराज जे होते, ते कोण होते?
ज्या ठिकाणी अज्ञान आहे, त्या ठिकाणी काही कळणार नाही. ज्याची प्रकृती सतशुद्ध आहे, त्यानेच हे ओळखले. सद्गुरु शिवाय कोणतीही हालचाल होत नाही. त्यांच्या कृपेशिवाय कोणीही हालचाल करू शकत नाही. हे समजले, मग राहिले काय? होते काय? एवढी गती जर सेवेकर्याला असेल तरच समजेल. ©️
