दिनांक: १४. १०. ७५ च्या आपल्या एकचित्ततेत सांगताना जगन्माता म्हणते, “अदृष्याला कोणी पाहिले आहे का? अदृष्याला मालकांच्या कृपेने पाहता येते. तेही आकारीच रूप आहे. आकारी स्वरुपीच वाटचाल करायला सांगते. मग अदृष्याची गती आणि त्यांचे ठिकाण मिळते व ओळख होते.
आम्ही जरी महान असलो तरी उत्पत्ती करणारे तेच आहेत. माझ्याही अंत:र्यामी तेच आहेत. त्यांना विसरून कसे चालेल? कर्तुम अकर्तुम शक्ती काय करील, ते कोणाला सांगता येणार नाही. ही शक्ती एकच आहे. अनंत नामे अनंत रूपाने ती नटलेली आहे. करूनही अलिप्त आहे. अनंत नामे त्यांना आहेत. त्यांचा अंत कोणालाही नाही.
ज्या वेळेला पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही नव्हते, पाणी नव्हते, वृक्ष नव्हते, आकाश आणि पातळ काही नव्हते, तेव्हा त्यांनीच ही सृष्टी निर्माण केली. त्यांना आम्ही विसरू का? तेच अखंड तत्त्व महान तत्व आहे. त्यांच्या पासून धुंधुंकार अन त्यापासून ओंकार. त्यापासून महामायेची उत्पत्ती झाली. नंतर त्रिगुण आणि त्यांच्या तीन शक्ती अन तदनंतर सृष्टीचा कारभार!
तोच कारभार हाकण्यासाठी आमच्याकडे दिला आहे. त्यांच्याच आदेशानुसार कर्तव्य केले जाते. एकच तत्त्व, एकच बिंदू सर्व ठिकाणी व्यापक असून, अलिप्त आहे. त्याला अंत पार नाही. मानवाला आकाराची सेवा केल्याशिवाय निराकाराची गती मिळू शकत नाही. आकार हेच ओंकार अन ओंकार हीच सतमाया आहे. ©️
