श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर त्याला ताटकळत ठेवणार नाहीत. प्रसंगातून त्याला ताबडतोब सोडवतील. तो सेवेकरी म्हणतो,”सता आपल्या चरणांवर मी सर्वस्व अर्पण केले आहे, माझ्याकडे अर्पण करण्यासारखे आता काहीच उरले नाही, अनंता जर काही शिल्लक असेल तर ते तुम्हालाच माहित असेल.” मी रहीत जे आहे ते अनंत!
गुरुगीतेमध्ये महेशांनी अंबेला सांगितले, “जीवित तेही समर्पिजे। म्हणजे सर्वस्व जो तुझा जीवात्मा आहे तो देखील तू अर्पण कर. काही शिल्लक ठेवू नकोस.” जीवात्मा अर्पण केलास की शिवात्मा प्रगट होईल. शिवात्मा प्रगट होणे म्हणजे आत्मज्ञान प्रगट होणे. गुरुगीतेत सांगितल्याप्रमाणे मी तू रहीत होणे म्हणजेच जीवात्मा अविनाशाप्रत अर्पण करणे. परंतु जीवात्मा अविनाशाप्रत अर्पण होत नाही. जागृतीत आल्यानंतर परत माझे तुझे चालू होते. या मायावीतून आपल्याला बाहेर पडावयाचे असेल तर, माझे तुझे रहीत होणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु आत्मज्ञान अनुभवायचे असेल, त्या अविनाशाप्रत जायचे असेल तर माझे तुझे करण्याचा काही उपयोग आहे का? तिथे द्वैताचा काय उपयोग? त्याकरीता आपणाला अद्वैत झाले पाहिजे. ©️
