श्री समर्थ मालिक – या भूमीवर किती अहंकार मातलेला आहे. त्या अहंकाराने सर्वस्वांवर कितीतरी मात केली आहे. गरीब लोकांची काय स्थिती आहे? म्हणून जे कर्तव्य घडवायचे ते घडवून घेणारच ! अन् ते कर्तव्य घडवून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. मायेकडूनच कर्तव्य घडवून घेणार, त्याशिवाय सत कर्तव्याला उज्वलता येणार नाही. सत कर्तव्याची उज्वलता झाली मग काय होईल ते सांगता येणार नाही.
आता थोडी थोडी सुरुवात झाली आहे. सर्वस्व आपल्याला दिसण्यात येईल. मात्र इतकेच आहे, कर्तव्याला सुरुवात कधी आणि केव्हा हे विचारावयाचे नाही. आपल्याला मागेच संदेश दिलेले आहेत. होणार हे होणारच ! ते चुकणार नाही. सेवेकऱ्यांनी घाबरू नये. हे घडल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून आपल्या कर्तव्यात जागृत राहणे. म्हणून तुकारामाच्या बोलाप्रमाणे, कोण आहे हे ओळखावे !
हे सेवेकऱ्यांनी ओळखून जागृत राहावे. फक्त जागृतीतच नव्हे तर आपल्या सताच्या आद्य कर्तव्यात राहावे. अर्थात सताच्या अखंडपदाच्या आसनावरून बहाल करण्यात आलेल्या नामात म्हणजेच नामस्मरणात राहावे. जे नामस्मरण आपणांस कोठेही म्हणजेच चालता, बोलता, उठता, बसता, येथे, तेथे, कोठेही करता येते. ©️
