श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अर्जुनाला सांगितले, “नाचतो मी तेथे भावो। ना भावो विद्यते सता ।। आहे ते सत आहे, सदभावनेने पाहता आले तर ते आहे. सदभावना नसेल तर पाहता येणार नाही. ज्योत जर सताबद्दल सद्गुरुंबद्दल सद्भावनेने ओथंबलेली असेल तर तिला सत पाहता येईल अन्यथा नाही. त्या सेवेकऱ्याला, त्या ज्योतीला दाखवितात, पहा मी कसा आहे? नूसत्या माया ब्रह्मात गुरफटलेला असेल तर त्या सेवेकर्याला त्यांचे रूप पाहता येणार नाही. अनुभव घेता येणार नाही. हे मना माझ्या हृदयस्थ जे सत, जे सद्गुरु विराजमान झालेले आहेत, त्यांना शरण जा. सर्वस्व त्यांना अर्पण करून ते कसे आहेत हे पाहण्याचा प्रयत्न कर. हे मना त्या सताची शक्ती अमर्याद आहे, ते क्षणात त्रिगुणांनाही लय करू शकतात तेथे तुम्हा आम्हा मानवांचा काय पाडाव लागणार? आपल्या सद्गुरूंना,आपल्या बाबांना जर सेवेकर्यांनी ओळखले आणि जर त्यांनी सहज जरी प्रश्न विचारले तर त्यांना सतशुद्ध भावनेने उत्तर देता आले पाहिजे , हेतू रहित, आत बाहेर काही न करता सांगता आले पाहिजे. उत्तर हेतू रहित दिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्या सेवेकर्यावर प्रसंग येतो, त्यावेळी त्याचे माया ब्रह्म त्याच्या उपयोगी येते का?
काही सेवेकरी दरबारात आल्यानंतर जवळ बसण्याचा प्रयत्न करतात, परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा, ”जवळ असो अगर लांब असो, सद्गुरूंचे प्रत्येक सेवेकऱ्यावर संपूर्ण लक्ष असते.” मन विशाल असेल तर तसे तरंग, तसे विचार मनात येणार नाहीत. जे मन विशाल, मोकळे असते तेच सताबद्दल, सद्गुरूंबद्दल सद्भावनेने ओथंबलेले असते. म्हणून सेवेकऱ्यांनो हे लक्षात घ्या, माया हीच तुम्हाला सतापासून दूर नेते. सदगुरु, सत जाणून बुजून कोणत्याही भक्ताला दूर करीत नाहीत. मन जर सद्भावनेने ओथंबलेले असेल तर तो सतापासून, सद्गुरूंपासून कदापिही दूर जाणे शक्य नाही. प्रत्येक सेवेकर्याने ही भावना सदैव मनात बाळगायला हवी की ज्या ठिकाणी मी आहे, त्या ठिकाणी माझे सद्गुरु माझ्याबरोबर असणारच! मी आणि सद्गुरु वेगळे नाहीत. जगात सर्व काही तुम्हा आम्हापासून दूर जाऊ शकेल परंतु सद्गुरु कदापिही तुमच्यापासून दूर जाणार नाहीत…©️
