श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु हे दयाघन तत्व आहे. ते सर्वस्व विसरून आदेश देतात. सेवेकर्याला प्रसंगातून सोडवून मार्गस्थ करतात. असे हे जे दयाघन तत्व आहे आणि अशा या दयाघन तत्वाच्या ठिकाणी तुम्ही शरण आहात, मनाने शरण आहात की शरीराने शरण आहात? मनाने शरण आहोत असे काहीजण म्हणतात, तर काहीजण शरीराने शरण आहोत असे म्हणतात. काहीजण म्हणतात आम्ही मनाने आणि शरीराने शरण आहोत, तर काही सेवेकरी म्हणतात आम्ही तिन्ही अंगानी शरण आहोत.
सेवेकरी म्हणतात ”बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे.”अरे सेवेकर्यांनो, तुमच्या या बंगल्यात वास करणारे हे सत नव्हे, या मायावी पसाऱ्याने तू काय साधणार आहेस? सताचा, सद्गुरूंचा बंगला फार वेगळा आहे. अरे तो महाल फार वेगळा आहे. त्यातून सतत अखंड नामाचा ध्वनी निघत असतो. सेवेकऱ्यांनो तो महाल पहायचा, अनुभवण्याचा प्रयत्न करा. या नकली मायावी महालामध्ये काय सापडणार आहे? तुम्हीच सांगा उद्या काही स्थित्यंतरे घडली तर हा तुमचा नकली महाल टिकणार आहे का? जर त्या अनंत तत्वाने पंचमहाभूतांना आदेश सोडले तर हा तुमचा नकली महाल किती टिकणार आहे? परंतु सद्गुरु दयाघन तत्व आहे, ते अनंतांना सांगतात की हे माझे सेवेकरी आहेत, त्यांना पूर्णत्व संरक्षण देऊन स्थित्यंतरे घडवा आणि अनंत तत्व सद्गुरूंच्या प्रणवाला किंमत देऊन, त्याप्रमाणे स्थित्यंतरे घडवतात, तुमच्या या मायावी नगरीत त्यांनी आपले स्थान प्रस्थापित करून, त्या स्थानाला अद्वितीय कर्तव्याची दिशा दिलेली आहे. तुम्ही त्यांना सद्गुरु म्हणता, तेच ते सत आहे त्यांना मार्गदर्शक कोण आहे तर अनंत तत्व! तेच सताला, सद्गुरूंना कर्तव्याचे मार्गदर्शन करतात. अनंतांशिवाय या विश्वाचा कारभार चालला नाही, चालत नाही आणि चालणार नाही. अनंतांखेरीज त्रिगुणांचा कारभार कोणीही हाकणे शक्य नाही, त्या अनंतांशी संबंधित असणारे तत्व सत आहे, सद्गुरु तत्व आहे…..©️३
