श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – हे मना तुझ्या ठिकाणी सद्गुरूंबद्दल का सद्भावना निर्माण होत नाही? माझ्या सद्गुरूं बद्दल, हे मना तू मागेपुढे का होतोस? आपणच आपल्या मनाला असा प्रश्न करावा. आपले जे सद्गुरू आहेत ते प्रत्यक्ष अनंत तत्वाशी, परम तत्त्वाशी व्यवहार करतात. त्याकरिता हे मना तू साशंक का असावे? सद्गुरूंच्या प्रणवाला अनंत किंमत देतात, साक्षात गुरुदेव पितामह (वशिष्ठ गुरुदेव) किंमत देतात, महान महान तत्वे किंमत देतात, अशा ठिकाणी हे मना तू का स्थिर होत नाहीस? माझ्या सद्गुरुंबद्दल तुझ्या मनात का आदरभाव निर्माण होत नाही? हे मना तू ठाम, निष्काम गतीने का वाटचाल करीत नाहीस? महान महान तत्वे, ऋषीमुनी ज्या माझ्या सद्गुरूंच्या चरणांवर लीन आहेत त्या सताच्या, सद्गुरूंच्या चरणांवर हे मना तू का बरे लीन होत नाहीस?
प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना तू का बरे स्थिर होत नाहीस? मन म्हणते, अरे ! मला तू असा प्रश्न करतोस पण तुझी कृती कशी आहे याचा तू कधी विचार केलास का? तुझी क्रिया, कृती, कर्तव्य कोणत्या तऱ्हेने चालू आहे याचा विचार तू केला आहेस का? आणि मग मलाच का बरे प्रश्न करतोस की सताच्या, सद्गुरूंच्या ठिकाणी मी का स्थिर होत नाही? तुझी क्रिया, कर्तव्य, कृती जर सद्भावनेने ओथंबलेली असेल तर मी का बरे तुझ्या सताच्या, सद्गुरूंच्या ठिकाणी स्थिर होणार नाही, का बरे माझ्या सद्भावना सद्गुरूंच्या ठिकाणी असणार नाहीत? म्हणूनच म्हटले आहे,यद भावो । तद भवतू ।। ©️
