श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – माझे, तुझे म्हणणारे, दाखविणारे जे तत्व आहे ते अत्यंत हुशार आहे. तुमचे हे जे मन आहे ते सतत हेलकावे खात असते. या मनावर ताबा मिळविण्यासाठी पूर्वीच्या काळी ऋषीमुनी अरण्यात जाऊन तपश्चर्या करीत असत, परंतु सेवेकऱ्यांनो तुम्हाला मात्र सत सानिध्यात घेऊन स्थिर करतात. तुम्हाला जर पूर्वीच्या ऋषीमुनींप्रमाणे करायला सांगितले तर तुम्ही करू शकाल का? लक्षात घ्या, संसाराची कर्तव्य करू नका असे मी सांगत नाही पण हे लक्षात ठेवा, आपले सद्गुरु जे काही आपणास सांगत आहे ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. मनाजवळ असलेल्या या मायारूपी मळाला दूर करून मन सतशुद्ध करा. या मळाला दूर करा, कितीही प्रवचने होऊ द्यात, कितीही वेगवेगळे विषय असू द्यात, परंतु सर्वात शेवटी प्रवचनाची धार येते ती मनावर. म्हणून सद्गुरु सदैव सांगत असतात मन सत शुद्ध करून सद्गुरू चरणावर अर्पण करा.
एकदा का तुम्ही सत चरणात, सद्गुरु चरणात लय झालात मग द्वैत राहणार नाही आणि अद्वैत म्हणजे काय याची जाण मिळेल. सद्गुरु आपल्यातच कसे आहेत हे पाहता येईल. सद्गुरु आणि सेवेकरी वेगळे राहणार नाहीत. आपल्या देहात जरी दहा इंद्रिये असली तरी त्यांच्यावर ताबा ठेवणारे कोण आहे तर मन आहे आणि हेच मन जर तुम्ही सद्गुरू चरणांवर अर्पण केलेत, अर्थात तुम्ही सतमय झालात तर अद्वैताची जाणीव मिळेल. मन स्थिर झाल्यानंतर दहाही इंद्रिये स्थिर होतील, म्हणून मनच जर अस्थिर झाले तर या इंद्रियांना स्थिरत्व कोठून येणार?
आपल्या सेवेकर्यांनी मन स्थिर होण्यासाठी सद्गुरूंची उपासना केली पाहिजे. म्हणजेच नामस्मरण केले पाहिजे. त्रिगुणरहित असलेल्या सद्गुरूंची उपासना तुम्ही केलीत, नामस्मरण केलेत तर तुमचे मन चरणांप्रत स्थिर होईल. अर्थात तुम्ही सतमय व्हाल आणि मग अद्वैत म्हणजे काय याचे ज्ञान होईल, जाण मिळेल आणि तुमचे सद्गुरु तुमच्यातच कसे वास करीत आहे ते पाहता येईल. ©️
