श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – श्रद्धेचे स्थान जे शुद्ध असावे लागते ते भक्ताजवळ नसेल तर भावना शुद्ध राहू शकेल का? श्रद्धेचे जे वसतीस्थान आहे ते जर शुद्ध नसेल, तर भावना शुद्ध राहू शकणार नाहीत. श्रद्धा आहे पण ती कशी, आम्हाला काळजी नाही, आपले बाबा आहेत, काहीही जरी झाले तरी ते बघतील. काही प्रसंग आल्यावर हाक मारल्याबरोबर सद्गुरु येतील. आम्हाला प्रसंगातून सोडवतील, आमचे सांत्वन करतील, माझे बाबा किंवा माझे सद्गुरू मला बिकट प्रसंगातून सोडवतील अशी सेवेकऱ्यांना खात्री असते. त्यांची श्रद्धा असते. परंतु सेवेकरी हा विचार अडचणीच्या वेळेला करतो. हा त्याचा भाव त्याच्यावर प्रसंग आल्यानंतर असतो. परंतु सेवेकर्यांनो तुम्हीच सांगा यासाठीच केवळ शक्ति आहे का? आपण पाहतो आपल्यात काही ज्योती, काही सेवेकरी असे आहेत की त्यांची मुलेच त्यांना दाद देत नाहीत, त्यांची मुले त्यांचे ऐकत नाहीत. अर्थात सद्गुरूंचे हे कर्तव्य आहे की अशा सेवेकऱ्यांना शांत करणे, त्यांचे सांत्वन करणे, कारण जर सेवेकऱ्याचे मन बेचैन झाले तर भक्ती होणे शक्य नाही.
शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास हा होणारच! काही शारीरिक त्रास झाला, काही प्रसंग ओढवला तरी देखील मन बेचैन होतेच ना? अशा वेळी मन शांत राहते का? मन बेचैन झाले की शरीर बेचैन होते आणि शरीर बेचैन झाल्यावर मन देखील बेचैन होते. जर तू आपले मन दृढ श्रद्धेने सद्गुरु माऊलींच्या चरणांवर पूर्णत्व अर्पण केलेस तर सद्गुरु तुला अशा व्याधींपासून दूर ठेवतात आणि मन सद्गुरु चरणांवर अर्पण करताना काही हातचे राखून केलेस तर त्याची बेरीज वजाबाकी त्याच तऱ्हेने होणार की नाही? …©️
