ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन त्यांच्या शक्तीही त्या ब्रह्मर्षी पदासमोर नतमस्तक असतात. यावरून आपण जाणले पाहिजे की मानवात असून देखील त्यांची योग्यता किती श्रेष्ठ होती. असे ते गुरुदेव पितामह! अन त्यांचे पद मिळवायला कोपिष्ट यातायात करीत होता. त्याकरीता तो गुरुकुलांचा नाश करायला निघाला होता, गुरुकुलातील योगी, योगिनींचा छळ करायला निघाला, ब्रम्हर्षी पद हे भक्तीचे पद! अनंतांनी बहाल केलेले पद!”
“ब्रह्म म्हणजे सर्व व्यापक आहे ते ब्रह्म”अन अशा गुरुदेवांची बरोबरी हा कोपिष्ट करू इच्छित होता. खरोखर कोपिष्ट अन गुरुदेवांची बरोबरी होऊ शकेल का? अघोरांनी कितीही सिद्धी मिळवली असेल, कितीही वनस्पती जमा केलेली असेल, तंत्र-मंत्र,ऋद्धी-सिद्धी अघोरांजवळ कितीही असो तरीदेखील भक्तीच्या पुढे हे सर्व थिटे आहे. भक्तीच्या पुढे त्यांचे काही चालत नाही. चालणार नाही. भक्ती म्हणजे काय? एकच नामस्मरण अन सद्गुरू ध्यान! जे अखंड नाम बहाल करतात ते आणि ज्यांची तुम्ही पूजा करता या दोघांचे समीकरण झाले तीच भक्ती! ही भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे की त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र, याबरोबर तुम्ही करू शकत नाही. इतर शक्तीपेक्षा आपली शक्ती कितीतरी पटींनी श्रेष्ठ आहे. भक्तीयुक्त गतीने जर मानव गेला तर त्याचे विवरण इतर शक्ती करू शकत नाहीत. गेल्या ३0 वर्षात जी काही कर्तव्य या आसनाकडून घडली त्यावरून आपण हे नक्कीच म्हणू शकतो की भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. कितीही महाबलाढ्य ज्योती असोत, आसनाचे आदेश घेऊन निघालेल्या ज्योती समोर त्यांचे काही चालत नसे. या अघोरांनी सर्व काही प्राप्त करून घेतले होते तरी देखील आसनाने कर्तव्यासाठी पाठविलेल्यांचा त्यांना थांग लागत नव्हता. मग आता तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण? भक्ती की अघोर तपश्चर्या? तर भक्तीच सर्वश्रेष्ठ! एकाच नामाच्या जोरावर चालणारी ही भक्ती! अघोरांकडे मात्र अनेक तऱ्हा मंत्र-तंत्र, अघोरांचा नाश करण्याकरिता मार्गदर्शन कोणाचे तर सताचे. म्हणून या सर्वस्वी अघोरांचा आम्हाला नि:पात करता आला. या सर्वस्वाचे मूळ कोणते तर भक्ती! भक्तीपुढे अघोर तपश्चर्या कूचकामी आहे. परंतु आजच्या कलियुगी मानवांना भक्ती एवढी प्रिय वाटत नाही…©️
