श्री विठ्ठल – आपल्याच हृदयी सद्गुरूंचा वास आहे. मन रानोमाळ भटकविण्याची आवश्यकता काय?
परंतु ही आपली दश इंद्रिये केव्हा आणि कधी निमग्न होतील? प्रत्येक सेवेकऱ्याचे मन शुद्ध सात्विक असेल, जास्तीत जास्त सद्भावनेने सेवेकरी राहील तर सद्गुरु दूर नाहीत. मग काशी, गया, प्रयाग वगैरे यात्रा करणे काहीही नको.
पतिव्रता ही पतीला मानण्यावर आहे. स्त्री प्रतिव्रता असली तर परमेश्वर भेटण्यास येतील. असे कितीतरी भगवंताच्या नावाने ओरडत असतील पण कृतिमान किती जण आहेत? भगवंताला काय पाहिजे आहे, तर काहीही नको. फक्त भक्ताच्या मनाचा शुद्धपणा, मनाची ठेवन, सद्भावनेची कृती हेच ते पाहतात. बाकी काही पाहत नाहीत. पण इतकेच आहे,
मन कसे शुद्ध होईल याचा प्रथम शोध केला पाहिजे. तेव्हा हे मन शुद्ध कोण करणार? सेवेकरी करणार का? तर नाही. मग कोण करणार? तर सद्गुरुं शिवाय हे होतच नाही, कोणीही करणार नाही.
“मन हे मज पासोनी जाण |” मग मन आळवले असा योगी कोण आहे? हे मन जरी मजपासून असले तरी प्रत्येकाची प्रकृती त्याच्या स्वाधीन आहे का? आणि म्हणूनच मनाची ठेवन, त्या तऱ्हेने चाचपणी असते. प्रकृती शुद्ध नाही मग मन गढूळ ! प्रकृतीच्या तरंगामुळे मन चल बिचल होते. भूमी शुद्ध झाल्यानंतर कृतीमान असले पाहिजे. अन हे जर टिकविले, मग प्रश्नच नाही. मग, मन गढूळ होईल का? ©️
