संत जनाबाई –विठ्ठल पांडुरंग ! सर्व घरी व्यापक असूनही अलिप्त आहे, तेच ते सत ! तेच ते सत आसनावर आरुढ आहे. मला भोळ्या भाबड्या सेवेकरीणीला, दासीला चकविण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्यक्ष सद्गुरु दरबारात बोलावणे झाले, आनंद वाटला. आज कशी काय सताला आठवण झाली याचे आश्चर्य वाटले. आपण मला महान भक्त म्हणता, पण जे महान आहे ते फार वेगळे आहे. त्याचे वर्णन कोणालाही करता येत नाही, जे कोणालाही सांगता येत नाही असे ते महान ! महान म्हणजे जगभर व्यापक आहे असे ते सत् ! सांगायला गेला, पहावयास गेला तर त्याच ठिकाणी रममाण झाला, असे ते महान आहे. म्हणून आपले काय आदेश आहेत? या दासी कडून काय सेवा घडेल तर ठीक होईल?आपण म्हणता जनाबाईने फार सेवा केली, मग जनाबाईने सेवा केली याला काही पुरावा आहे का? सेवा केली म्हणावे, तर सेवा कोण कोणाची करतो? स्थूल देही जडत्व म्हणजे जाणे ! पण त्याच्याही अंतर्यामी कोणीतरी आहे. स्थूल जरी लय होणारे असले तरी त्याच्याही अंतर्यामी कोणीतरी आहेच. मग जना जडत्व सोडून का गेली? यावरून कोणाच्या सत्तेने सेवा घडली? कोणी सेवा केली? म्हणजे जन्मा येऊन सेवा नाही केली. याचा अर्थ ज्याचा तोच. प्रकृतीला चालना देऊन सर्वस्व सेवा करून घेतो. जडत्वाने सेवा केली हे म्हणणे साफ चुकीचे आहे. जे रोमारोमात चैतन्य भरलेले आहे, ते सर्वस्व करून घेते. मग जना सेवा करणारी कोण? आणि कोणी सेवा केली? म्हणून माझ्याकडून काही सेवा झाली नाही. माझे सत जर अंतर्यामी नसते, तर सेवा करायला काही आधार आहे का? पंचमहाभूतांचा देह फेकून देतो तरी कोण? ज्याचा तोच. जडत्व माये कडून सत असत कृतीची पाहणी करून, त्याची भरपाई करून घेणारे, त्याप्रमाणे प्रकृतीला चालना देणारे, त्याप्रमाणे कृती करून घेणारे, तेच आहेत आणि त्याप्रमाणे सर्वस्व कृती करून घेतात. म्हणूनच जडत्व अंगाने म्हणावे लागते, जन्मा आले, पण विठ्ठला तुझी काहीही सेवा केली नाही. म्हणून सेवा करतो हे म्हणणे साफ चुकीचे आहे. खरे नाही. सत्य नाही.
समर्थ माऊली प्रकृतीचे चलन वलन पाहून संचिताप्रमाणे आपल्याजवळ घेत असतात. परम शक्तीची जर चेतना नसती, तर मी या ठिकाणी आले असते का? मी करतो हे म्हणणे साफ चुकीचे आहे. जे त्यांना पहावयाचे, ते पाहतात. जे घडवून घ्यावयाचे, ते घडवून घेतात. मात्र सेवेकऱ्याने मनाचे अधीन बनणे सोडून द्यावे. मनच त्यांच्या चरणावर अर्पण केल्यानंतर बाकी काही नाही. देव भक्तीचा भुकेला असतो. देव आणि समर्थ दोन वेगळे आहेत का? मला तर दोन दिसत नाहीत. मला सर्वस्व एकच दिसत आहे. अनंत नामे अनंत रूपे धारण करणारे ते ! त्यांचा हात कोण धरू शकेल? नाम्याच्याही अंतर्यामी तुम्ही नाही वाटत. असे चोरून का ठेवता? असेच कधीतरी दर्शन मिळावे ही इच्छा ! (समाप्त)©️
