जी अखंड सेवा आसनावरून दिली, तो अखंड ध्वनी आसनी-शयनी, भोजनी, तसेच सर्व कर्तव्यात सारखा चालू राहील, मग त्या सेवेकऱ्याचे भलेबुरे पहाणारे कोण? तर तेच ! मी नव्हे ! ज्याला तुम्ही शरण आहात ते !
आरती म्हणजे काय? हे सेवेकर्याला कळले आहे का? आरती, अनंत भूजा ! विठो पंढरी राजा !! आरती या तीन अक्षरांचा अर्थ काय? आरती म्हणजे काय? अनंत पूजा म्हणजे काय? विठो म्हणजे काय? अशी ज्या सेवेकऱ्याने आरती केली, तो सद्गुरु चरणात, सद्गुरु भक्तीत किती रममाण झाला असला पाहिजे? आरती आहे की नाही? कोण आरती करून घेतो? हे तरी त्याला समजेल का? असा रममाण असल्यावर, तो कधी घरीदारी फिरेल का?
सेवेकरी दरबारात आल्यानंतर चित्त देऊन ऐकतात. दरबाराच्या खाली उतरल्यानंतर त्यांचे लक्ष दाही दिशा फिरते. कानांची श्रवणी दाही दिशा असते. तरी पण या आसनाचे सेवेकरी, जे या ठिकाणी येत आहेत, ते अत्यंत भाग्यवान आहेत. कारण ही गती, हे सानिध्य मिळणे फारच कठीण आहे. अजूनही सेवेकरी येणार आहेत. आलेले काही बाहेर गेले आहेत. ते निराळे आहेत. सद्गुरु हसतील, बोलतील, सर्वस्व करतील, पण गुह्य खुण जाणने फार दुरापास्त आहे. ती सेवेकर्यांनी जाणली की अंत लावला असे म्हणता येईल. जोपर्यंत आसनाचा सेवेकरी झाला नाही, रित, गती काहीएक माहिती नाही, तोपर्यंत त्याला बोलता येत नाही. पण सेवेकरी झाल्यानंतर त्याला बोलणे आवश्यक आहे. त्या सेवेकर्याला अनुभव मिळाल्यानंतर, माझे आणि तुझे असे म्हणता येईल का? ©️
