श्री नर्मदा निवासी मालिक – आसनाची मर्यादा ही ठेवलीच पाहिजे. महान तत्व, महान पद जरी असले तरी त्याच्याकडून चुका होतात. मग मानवांचे काय? लाघवी तऱ्हा मी करू शकत नाही. लाघवी तऱ्हा करणारे करतात. माझे त्यात काही नाही.
भक्तीची अंगे दोन आहेत – (१) एक सत् भक्ती अन् (२) दुसरी असत भक्ती. म्हणून त्या ठिकाणी लाघवी तऱ्हा होत असते. सताचेही भक्त आहेत आणि अघोरही भक्त आहेत. म्हणून दोन्हीही आपआपल्या तऱ्हेने भक्तांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. पण सत् हे सतच आहे. ते सताचीच बाजू घेत असते. अखेर सताचाच विजय होतो. मायेचा विजय होणे दुरापास्त आहे.
सध्याची परिस्थिती कोणत्या तऱ्हेने चालली आहे? आदी अंतापासून सर्वच काही सताचे भक्त नाहीत. सताचे भक्त कधीही वाया जाणार नाहीत. पण मायेचे भक्त त्यांना अशी मनोभावना होती की हेच सर्वस्वाचे निधान आहे. आपल्यापुढे कोण जाणार आहे? ऋद्धी सिद्धी, तंत्र मंत्र यांनी ते परिपूर्ण असल्यामुळे ते उन्मत्त होतात. सताचे कर्तव्य धीर गंभीर आणि शांततेचे असते. त्या ठिकाणी माया ही आडवी येते म्हणजे तिचे काही चालत नाही.
सध्याच्या चालू परिस्थितीमध्ये सत किती आणि असत किती प्रमाणात आहे हे आपणास पूर्ण माहित आहे अन् याचा उहापोह मागे केलेला आहे. आजच्या परिस्थितीत सतावर पुष्कळ दडपण आहे. तरी सुद्धा कर्तव्य होत आहे. म्हणून पुष्कळ त्रास होतो. आता थोडे दिवस बाकी राहिले आहेत. मग आपणास कळेल कुणाची बाजू सरस आहे ते. सत् भक्तासाठी कष्ट सोसणे हे सताचे कर्तव्य आहे. सताला दुःखाच्या डोंगरातून, काट्याकुट्यातून पार पडायचे असते. अन् ते सत् काट्याकुट्यातून, बिकट मार्गातून पार पडून जातेच जाते. (समाप्त) ©️
