श्री समर्थ मालिक – सर्व सेवेकरी पूर्व संचिताप्रमाणे या आसना सानिध्यात घेतले आहेत, मग हेवे दावे कशासाठी? याचा विचार तुम्ही करा. यानंतर मात्र हेवेदावे नकोत. आसनाधीस्त हे तत्त्व साधे सुधे नाही. ते कोणाकडून काहीही करून घेतील, ते कोणाला कळेल का? मग सेवेकऱ्यांचे मन गढूळ का? मनात शंका का? अन् कशासाठी? त्यांनी जे बीज पेरले ते एकच पेरले आहे, मग मनात शंका का? उद्धवाला असेच वाटत होते. मी आदेशाप्रमाणे वागतो आहे. हे समर्थ रामदासांना कळले.
रामदासांची आणि रंगनाथांची भेट झाली. त्यांनी त्यांना सांगितले, मी गडावर जाऊन येतो, तोपर्यंत तू येथेच राहा. गडावरून यावयास त्यांना वेळ लागला. परंतु रंगनाथ एकाच ठिकाणी उभा राहिला. तेथून श्री लटकर आले, त्यांनी विचारले, “महाराज तुम्ही उन्हात उभे का?” त्यांनी सांगितले, “समर्थ आदेश आहेत, त्याप्रमाणे मी येथेच उभा राहणार.” या ठिकाणी समानता आहे ना? मग मनात शंका का? लाघव झाल्यावर कोकाटता का? क्षमा मागायची काय जरुरी? मग हा दोष कोणाचा?
मनाची भावना शुद्ध ठेवली तर तीर्थाची खाण कोठे आहे? झरा कोठे आहे? कोठे स्नान करावयाचे? मनाचे मुंडन होईल त्यावेळेला तीर्थाची खाण कोठे आहे हे कळेल, पण बुद्धी, कृती सत् ठेवाल तेव्हा. मन अशुद्ध असले अन् तीर्थाची खाण जरी जवळ असली, तरी ती प्राप्त होणे कठीण आहे.
मनाची शुद्धता करा. सत् वर्तणुक ठेवा, नाही पेक्षा तुमच्यासारखे अभागी कोण? हे तुम्ही शोधा. या दरबारात जी घडण घडते, ती दुसरीकडे कोठे घडते का? याची सुद्धा पाहणी करा. सेवेकर्यांनी शुद्ध होण्याचा प्रयत्न करा. गटबाजी करू नका हे संदेश आहेत. (समाप्त)©️
