श्री समर्थ मालिक – मी नाही असा रिकामा ठाव नाही. संतांनी वर्णन केलेले आहे की, भगवंता शिवाय वृक्षाचे पानही हलत नाही. पवन सुटत नाही. पर्जन्य पडत नाही. सर्वस्व माझ्या सत्तेने होते. असे जर आहे, तर सेवेकर्यांनी आपल्या हृदयात याची खूणगाठ का बांधू नये? मी तू रहित का होऊ नये? मी तू रहित झाल्यानंतर सर्वांचे मन एकत्र होईल की नाही?
प्रकृतीच्या अंगाने सेवेकरी पाहतो – तो लहान, तो मोठा ! पण यात लहान आणि मोठे काही नाही. हे ज्याच्या त्याच्या कर्मसंचिताप्रमाणे असते. काहींना वाटत असते, मी निराळा आहे. पण सर्व घरी, सर्वांठायी जर मी आहे, तर मी निराळा कशावरून?
म्हणूनच आपल्या सेवेकर्यांनी मी कोणाचा सेवेकरी आहे हे ओळखावे. सर्व सेवेकरी एकाच तत्त्वाचे आहेत. ते माझे कोण आहेत? माझे जन्मदाते सर्व ठिकाणी विखुरले आहेत, याची गती सर्व सेवेकऱ्यांना सापडली असेलच. असे जर आहे, तर त्या ठिकाणी शांत कृतीने मनाला आळा का घालू शकत नाहीत? तरंग का दूर करू शकत नाहीत? तर हा विसरभोळेपणा नाही का? ©️
