पंढरपूर निवासी श्री विठ्ठल – ब्रह्म – ब्रह्म म्हटले म्हणजे त्या ठिकाणी सर्वस्व स्थिरावले जाते. हे उच्च कोटीचे स्थान होय. ज्याला स्थिती स्थापकत्व, त्या ठिकाणी सर्व लय होते, मिलन होते. सद्गुरु मिलन तेच ब्रह्म होय. मानवाचे कोड कौतुक पुरविण्यासाठी त्रिगुणात्मक आकार निर्माण होतो. त्यावेळेला अल्प बुद्धीप्रमाणे जवळ असते ते सांगणे होते. चित् सत् त्याचा आनंद तेच ब्रह्म होय ! या ब्रह्मामध्ये लिन झाल्यानंतर, मग काय शिल्लक राहते? तर काही नाही. ते सांगताही येत नाही. सर्वस्व लिन होते. जो आनंद लुटतो, तो सांगता येत नाही. तेच ब्रह्म !
तेथे कसे जावे? ते कसे पाहावे? कोणत्या मार्गाने जावे? याची मानवाने वाटचाल करावयाची असते. ज्याला साधी सोपी भोळी भक्ती म्हणतात, ज्याला षड्रिपूची बाधा नाही, जो पूर्णत्व सत शुद्ध आहे, असा साधा भोळा भक्त, तोच सद्गुरु चरणी लिन होतो. त्याचे चित्त लयबद्ध होते. लयबद्ध झाल्यानंतर जो आनंद, तेच ब्रह्म होय ! त्यातील सर्वस्व ज्या ठिकाणी स्थिरावते, तेच ब्रह्म ! श्रवण, मनन, चिंतन यानेच त्या ठिकाणी जाणे होते. पण मानव संसारात गुरफटत असतो.
प्रथम मन स्थिर करावयाचे, नंतर सत शोधावयाचे ! याचा जो मार्ग तोच राजमार्ग होय. या मार्गाने चित्त स्थिर करावयाचे. अशा रीतीने चित्त ज्या ठिकाणी स्थिरावते, लय होते, ते ब्रह्म होय ! मानवाचे सर्वस्व सार काय? उत्पत्ती, स्थिती, लय कशासाठी? हे ब्रह्म ओळखण्यासाठी सांगितलेल्या राजमार्गाने गेलात तर ब्रह्म हे काय आहे हे कळेल. पण हे कठीण आहे. मानव हा त्रिगुणात गुरफटतो. मानव या राजमार्गाने गेल्यानंतर सत मिळेल. त्या ठिकाणचा एक क्षण का होईना, आनंद लुटणे. त्याचसाठी आपली जीवनयात्रा घालवायची असते. (समाप्त) ©️
