गुरुपद हे अखंड त्रिकाला बाधित आहे. ते कोणीही निर्माण केलेले नाही. कोणीही निर्माण करविता नाही. असे हे स्वयं आणि अखंड पद आहे. याची महती, महिमा अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यांची वाणी, त्यांचे आदेश याला अतिशय महत्त्व आहे.
गुरुपद हे ज्ञानमय बीजारोपण करण्यासाठी विखुरले आहे. हे अनाठाई जाणार नाही. स्वयंपद गुरुपदाच्या मुखातून निघाले, तरी पण ते गुरुपदाला किती लिन आहे? गुरुपदाच्या मुखातून निघालेली अमृततुल्य वाणी झेलने हे प्रत्येक सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे.
एकमेक एकमेकांवर अवलंबून आहेत. आपण मानव आहात. संशयात, षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटले आहात. या सर्वस्वातून सुटका करणारे एक महान श्रेष्ठ पद आहे. तेच हे गुरुपद आहे. त्या गुरुपदाशिवाय सेवेकऱ्यांना वाचविणारे, तारणारे, त्यांचे कोडकौतुक पुरविणारे दुसरे कोणीही नाही.
सद्गुरु आणि सेवेकरी यांचे नाते संबंध फार निराळे आहेत. वेगळे आहेत. आपल्या सेवेकऱ्यांसाठी ते हेलावतात. लयबद्ध होतात. कोणालाही ते दूर लोटित नाहीत. असे हे पूर्णत्वाने दयाघन तत्व आहे. हि दया इतर ठिकाणी आढळणार नाही. सेवेकरी कोणत्याही तऱ्हेचा असो, तो सद्गुरुमय व्हावा अशी त्यांची आंतरिक तळमळ असते.
कर्तव्य केल्यानंतर मुक्ती आणि मोक्ष दूर नाही. आपण जाणते सेवेकरी आहात. ओळखण्याची खूण थोडी आहे, ती ज्याला मिळाली तो धन्य होय. ज्यांना मिळाली नाही, त्यांनाही ती मिळेल, पण हळूहळू कालांतराने. हे सानिध्य मिळायला भाग्य लागते. सेवेकऱ्यांना सद्गुरु कधीही दूर लोटित नाहीत. दूर जाऊ देत नाहीत. असे हे दोन तत्त्वात भरलेले सद्गुरुपद, याचाच ठाव सेवेकर्यांनी घेणे. हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे.
प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला सेवेकऱ्याला आपल्या अमृतमय वाणीने सिद्ध करण्यासाठी संदेश देत असतात. ते संदेश सेवेकऱ्यांनी पाळावयाचे असतात. या संदेशांना फार महत्त्व आहे. याचे निवेदन केलेले आहे. जरी सेवेकर्यांनी संदेश पाळले नाहीत, तरी सद्गुरु कोपिष्ट होणार नाहीत. त्याला गोड शब्दात समजावून सांगतील. प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत. त्याच्या पूर्व संचिताप्रमाणे जे लागेबांधे आहेत, ते श्रेष्ठ आहत. हे नाते अखंड आहे. अखंड पद आहे. ८४ लक्ष योनीत जरी सेवेकरी भटकला तरी सद्गुरु पदाचा ठाव घेण्यासाठी त्याला पुन्हा मानव जन्मात पाठवितात. (समाप्त)©️
