सद्गुरु हेच माझे दैवत, पिता, माता सर्वस्व आहेत. असे जो सेवेकरी जाणतो, त्या सेवेकऱ्यास सर्वांगीण सेवा काय आहे ते कळते. पण काही नुसते सद्गुरूंशी गोड बोलणारे आहेत. अशांची कितीतरी सेवा राहिली आहे, चुकली आहे, पण त्यांनी कधी कोणाला काही म्हटले आहे का, की आपण सेवा का देत नाही? त्यांना माहीत असते, हा सेवेकरी अखेरीस कुठे येणार आहे. जो तन मन धनाने आपली सेवा अर्पण करतो, तो सेवेकरी कधीही वाया जाणार नाही. ज्या सेवेकऱ्याने सद्गुरु कृपेने हे जाणले आहे, त्या सेवेकर्याला आसनसेवा दे, असे म्हणण्याची आवश्यकता नाही. आसन सेवा ज्याला पूर्णत्वाने समजली आहे, तो सर्वस्व बाजूला सारून प्रथम आसन सेवा देतो.
काही सेवेकर्यांची तळमळ असते, काहीही असो, आपल्याला नसले तरी चालेल, पण आसन सेवा प्रथम ! कांहीं सेवेकरी सद्गुरूंशी गोड बोलून दिवस ढकलण्याच्या पाठीमागे असतात. तो सेवेकरी कोरडा तो कोरडाच राहत असतो. म्हणून सेवेकर्याला कोणीही विचारू नये, सांगू नये. सेवेकरी होतो त्या वेळेला तन-मन-धन वाहिलेले असते, पण मला वाटते, अंत:करणापासून वाहिलेले नसते, म्हणून त्याची तीनही अंगाने सेवा करण्याची इच्छा नसते. परंतु, सेवेकऱ्यांची काय ताकद आहे की आसनाचा, सर्वत्र कुटुंबाचा खर्च चालवण्याची? परंतु ज्याला चालवून घ्यायचे, तो आपोआप चालून घेतो. म्हणून अशा महान तत्वाशी कोणीही सेवेकऱ्याने डोळे झाक करणे योग्य नाही.
सद्भावनेने, शुद्धतेने तीनही अंगाने शरण आहे, त्याने थकलेली सेवा आपोआप आणून दिली पाहिजे, तर तो सेवेकरी. समर्थांना सर्वस्व माहित आहे, पण एखादे वेळी मायेला कलाटणी दिली तर कुठून काय करील? आणि नंतर मग शेवटी येतो कुठे? आसना जवळच ना? ज्या सेवेकर्याला आसनाची, सद्गुरूंची सेवा होत नाही, आपल्या सद्गुरू बद्दल प्रेम नाही, आपुलकी नाही तो सेवेकरी कसला? त्याला सेवेकरी म्हणता येईल का? फक्त वरून म्हणता येईल, अंत:करणा पासून नाही. म्हणून सेवेकर्यांनी येथून पुढे स्वतःच्या कल्याणासाठी जागृत राहून तिन्ही अंगाने सेवा करण्यास तो तत्पर राहील, अशी इच्छा मी बाळगावी का? येथून पुढे तरी, सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या सत कर्तव्यात जागृत राहणे आणि ते जरूर राहतील, असे सर्व सेवेकऱ्यांना संदेश आहेत. या सेवेकऱ्याचे अंगी भक्तीचा मळा पाझरतो आहे, झरा वाहतो आहे, त्या सेवेकर्याला कोणत्याही तर्हेच्या निसर्गाची भीती नाही. त्याने निर्धास्थ राहावे. मात्र तसा सेवेकरी असला तर !!! (समाप्त) ©️
