श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – परिमळ कसा असतो तर अत्यंत निर्मळ! परिमळ म्हणजे सुवास, सुगंध कसा असतो? परंतु ही माया निर्मळ असते का हो? म्हणून सद्गुरु सांगतात या मायेत गुंतून राहू नकोस. सर्वस्व सत चरणावर अर्पण कर, अर्थातच सतमय हो. द्वैत दूर केल्याशिवाय तुला अद्वैताचा अनुभव येणे शक्य नाही. अद्वैत झाल्याशिवाय एकचित्त होणार नाही आणि एकचित्त झाल्याशिवाय प्रकाश मिळणार नाही आणि प्रकाश मिळाल्याखेरीज आत्मनंदात लय होता येणार नाही. म्हणून सेवेकर्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की सतमय झाल्याखेरीज अद्वैत होणे शक्य नाही. तुमचे सद्गुरु तुम्हाला परोपरीने, तळमळीने समजावून सांगतात. सेवेकऱ्यांवर काही प्रसंग आला तर गुपचूप संदेश देऊन कार्य करून घेतात, मग आता अद्वैत होण्याच्या मार्गावर तुम्ही नको का वाटचाल करायला?
जे सताच्या ठायी अद्वैत होतील ते खरोखर भाग्यवान! पण सताशी जे द्वैत भावनेने व्यवहार करतील ते अद्वैत होणे कदापिही शक्य नाही. जे अद्वैत आहेत त्यांना ते आपल्या सानिध्यात घेतील, मग असे सेवेकरी भाग्यवान नाहीत का? अशा सेवेकऱ्यांच्या मनात ही भावना सतत वास करीत असते की सत माझे आहे आणि मी सताचा आहे, सद्गुरूंचा आहे. असा सेवेकरी असल्यानंतर त्याच्यावर प्रसंग यायला देतील का?
सत आपल्या भक्तांसाठी तत्पर आहे, सद्गुरु आपल्या सेवेकऱ्यांसाठी तत्पर आहेत, असतात, पण भक्त भगवंतासाठी तत्पर असतो का? सेवेकरी सद्गुरूंसाठी तत्पर असतो का? सद्गुरु म्हणतात, सेवेकरी माझा आहे, परंतु सेवेकरी म्हणतात का, सता मी तुमचा आहे? ते म्हणतात मी अजून माझाच आहे! सद्गुरु विचारतात,” तू तुझा आहेस मान्य आहे परंतु सताचा केव्हा होशील?” अरे! सताच्या, सद्गुरूंच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एवढा विलंब का करतोस? एवढा विचार कसला करतोस? सर्वात प्रथम हे लक्षात घे की सद्गुरु मिळणे हेच महत्त्व भाग्य आहे. हीच सर्वात प्रथम पायरी आहे. मानव जन्म जरी घेतला तरी सद्गुरु मिळणे अत्यंत दुरापास्त आहे आणि सद्गुरु प्राप्त झाल्यानंतर ते टिकविणे त्याहीपेक्षा कठीण! आज सेवेकऱ्यांनो तुम्ही सानिध्यात आहात म्हणून तुम्हाला थोडे तरी कळतंय, परंतु आज बाह्य जगात लोकांची अवस्था कशी आहे ही तुम्ही पाहतच आहात.©️
