श्री विठ्ठल – साधा भोळा चोख्या, तो कुठे तीर्थ करायला गेला होता? त्याने लिखाण केले आहे ना? तो बराच शिकलेला होता का? मग आता शिकलेल्यांनी सांगा, आताचे भक्त कसे आहेत? तुकोबाने, जनाने, नामदेवाने कोणत्या तऱ्हेने भक्ती केली?
पापाचे घडे कसे धुतले जातात? तर नामानेच जातात ना ! याचे संतांनी वर्णन केले आहे. एकाच नामाने अनंत जन्मीच्या पापाचे खंडन होते. पण त्याला ज्योत कोणत्या तऱ्हेची पाहिजे? नामस्मरण करतो आहे. पण हजार धंदे चालू. मग त्याच्या पापाचे खंडन होईल का? केव्हाही होणार नाही. मग त्याची भावना जरी असली तरी तत्त्वाचे ठिकाणी रुजू नसते.
आवडीने भाळी लावले टिळे | परी तुझ्या चरणी रविंद्र न लोळे || दर्शन झाले की, मुक्ती मोक्षाला हात घातला का? यांना माया बनविते. आम्ही त्या ठिकाणी चूप असतो. हे माझे भक्त आहेत, असे म्हणणे सुद्धा माझा गुन्हा होतो. मी अशा संतांना भक्तसुद्धा म्हणू शकत नाही. समर्थांचा म्हणा अगर माझा म्हणा जो भक्त असेल, तो कुठेही जाणार नाही. आम्हाला त्याचे ठिकाणी धाव घ्यावी लागते.
आता दुसरी गोष्ट, तुळस म्हणजे काय? महान पवित्र तत्व आहे ते ! त्याची माळ हातात घेऊन जप करावयाचे. तिला हातात घेऊन वाटेल ते करावयाचे. तिला तरी त्यातून मोकळी करा. तिला हातात घेऊन, चोऱ्या, माऱ्या, लबाड्या करतात. जितके माळवाले आहेत, त्यांना परमेश्वराचे नाव माहित नाही म्हणून घालतात येरझारा. पूर्वीचे संत निष्काम गतीने गेले. त्यांची कृती पाहून मूर्तीला पान्हा फुटला. म्हणजे मूर्ती प्रवेश घेऊन पान्हा फुटतो, पण भावी भक्त तिथे गेला तर ! (समाप्त)©️
