बाबा – सर्वस्व सृष्टीची रचना करणारे आपण, ॐ कार ध्वनी फेकणारे आपण अन् सगुणाला पुढे करून कार्य करून घेणारे आपण !
मालिक – आपण म्हणता हे खरे आहे. पण वाईट वाटते एकच की, सेवेकर्यांनी हे घेतले नाही. जर हे घेतले असते तर हे शहर दुमदुमून सोडले असते. सेवेकर्यांना अनुग्रह मिळाल्यापासून उच्च दर्जाचे बोल मिळत असताना ही संपत्ती त्यांनी का लुटू नये? भंडार का लुटू नये? मग याची गोडी सेवेकर्यांना का असू नये? जर आहे मग लुटण्याची मनाई केली आहे का?
बाबा – सेवेकरी लुटायला जातात पण तुम्हीच लुटू देत नाहीत. त्यांना तळमळ आहे. खजिना जवळच आहे पण तुम्ही पोहचू देत नाहीत.
मालिक – पण शंका रहित सेवेकरी झाला की त्या खजिन्याला त्याने हात घातलाच समजा. थोडीशी मनाला शंका आली की, मायेचा पगडा बसलाच !
बाबा – शंका का येते? तर मन चंचल होते.
मालिक – त्यात माझा काय दोष? महामायेला थोडी संधी मिळाली की सेवेकरी गयावया करतो. कारण नटलेले जे आहे ते मायावीने नटलेले आहे अन् म्हणून माया कोणालाही माझ्यापर्यंत येऊ देत नाही. ज्याने तत्वाची ओळख करून घेतली, जे ठाम राहिले तेच या ठिकाणी येऊ शकतात. ही बया आहे. ती म्हणते मीच सर्वस्व ! तिला अधिकार दिलेले आहेत म्हणून सेवेकरी फसतो. (समाप्त) ©️
