हल्लीच्या काळात लोकांच्या मनाला वाटते, या जगात एक शक्ती आहे, पण ती शक्ती कशी पाहता येईल याची त्यांना गती नाही, म्हणून मानव भ्रमात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, आंधळ्याला वाट दाखविणारा कोणी नाही. आंधळा काठीच्या मार्गदर्शनावर चालत असतो. मी त्याला वाट दाखवीत असतो. मानवांची ती काठी म्हणजेच सद्गुरु होय !
ही आंधळ्याची काठी आहे. मानव हा आंधळा आहे. सद्गुरु कृपेने मानव प्रकाशित झाल्यानंतर, त्यांच्याच कृपेने वाटचाल करू शकतो. मात्र काही मानवांना सद्गुरु तत्व पटते आहे, तर काहीना ते पटलेले नाही. काहींना सद्गुरु पेक्षाही महान तत्व आहे असे वाटते, म्हणून ते पळवाट काढतात. पण सद्गुरूंची तत्वं वाया जाऊ शकतील का?
अशा अनेक व्यापांमुळे ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र, याने महान तत्वाचा अंत लागेल का? मानव चमत्कार करील, अनेक उपाधी करील, पण सत् भक्तीला उपाधी व्याप आहेत का? जो सत भक्तीत आहे, सत मार्गाने वाटचाल करीत आहे, सताच्या ठिकाणी ध्यानस्थ आहे, त्याचा कोणी केसही वाकडा करू शकणार नाही, करणार नाही. असे चमत्कार, नमस्कार करणाऱ्या मानवांना हे कसे पटेल? त्याला वाटते की मी विशेष कोणीतरी आहे. म्हणून या दरबारची गती त्याला मिळणे फार दुरापास्त आहे. म्हणून अशा मानवांना सतमार्ग पटेल का? त्याला पटणार नाही. पटू देणार नाही. (पुढे सुरु…..२) ©️
