सत् भक्तीचा प्रकाश – आपल्या भारत भूमीमध्ये प्रत्यक्षात भगवंताने अनेक अवतार नटवून त्याला पुनीत केलेले आहे. असा हा महान पवित्र व मंगलमय देश आहे. याच भारत भूमीमध्ये अनेक ऋषी, मुनी, महामुनी व तत्वज्ञानी जन्माला आले. सर्व विद्येमध्ये पारंगत असे ज्ञानी, साधू, संत, आचार्य, महंत याच भारत भूमीमध्ये निर्माण झाले.
एकेकाळी या देशामध्ये शूर, वीर, राजे आणि महाराजे आनंदाने नांदत होते. महान महान ऋषी मुनींचे आश्रम व गुरुकुलें या ठिकाणी होती. काव्य, शास्त्र, धर्म, नीति आणि सत् भक्ती या सर्वांमध्ये हा भारत देश अग्रगण्य होता. अशा या महान पवित्र भारत भूमीला अशी स्थिती कां यावी?
याचे कारण एकच – भक्तीचे मार्गदर्शन करणारे जे काही मानव सद्य: स्थितीत आहेत, त्यांनी आपले निष्काम कर्तव्य सोडून सर्वस्व आपआपल्या स्वार्थासाठीच हे चालविलेले आहे. ज्यात भक्तीभाव नाही, अर्थज्ञान नाही, अशा त-हेने अर्थशून्य आणि स्वार्थी अर्चन त्यांनी चालविलेले आहे. एकमेकांना सहकार्य करावयाचे सोडून स्वार्थ हेच ध्येय त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेविलेले आहे. ज्यांच्या ठिकाणी उच्च आणि नीच हा भेदभाव आहे अशांचे कधीही भले होणार नाही. क्रिया आणि वाचा यांत मेळ नसल्या कारणाने सर्वत्र दांभिकपणा आढळून येतो. यामुळे मानवांच्या ठिकाणी संशयाचें बीजारोपण झाले, त्यांची मनोभावना बदलली.
अखिल विश्वाचा चालक, मालक, पोषक आणि त्राता असा जो सर्व शक्तिमान परमेश्वर याला मानव विसरून गेलेत आणि म्हणून सत् भक्तीचा लोप होऊन मानव अधोगतीला गेले. स्त्री आणि पुरुष ही संसार गाड्याची दोन चाकें आहेत, पण या चाकांची गती सद्भक्तीचा लोप झाल्याकारणाने कुंठीत झाली आहे.
तेव्हां सत्भक्ती ही कोणत्या तऱ्हेने करावी हा मानवांपुढे मोठा गूढ प्रश्न पडतो. कारण ज्ञानमार्गी होऊन निर्गुण उपासना करणे संसारी जणांस कठीण वाटते. त्याचप्रमाणे योग, याग, व्रत, वैकल्ये आणि उपास-तापास करणे हा सुद्धा खडतर मार्ग आहे व वाटतो. अशाने मन शुद्ध तर होणार नाहीच, पण ते कधीही आकळले जाणार नाही. तसेंच संसार आणि परमार्थ हे दोन निरनिराळे जीवनक्रम आहेत असें मानणाऱ्यांस ईश्वरी साक्षात्कार होणे शक्य नाही. जवळ जवळ अशक्यप्राय स्थिती होय. (समाप्त)©️
