“मन हे मज पासोनी जाण |” मग मन आळवले असा योगी कोण? हे जरी मजपासूनही असले तरी प्रत्येकाची प्रकृती त्याच्या स्वाधीन आहे का? आणि म्हणूनच मनाची ठेवण, त्या तऱ्हेने चाचपणी असते. प्रकृती शुद्ध नाही मग मन गढूळ होणारच ! प्रकृतीच्या तरंगामुळे मन चल बिचल होते. भूमी शुद्ध झाल्यानंतर कृतीमान असले पाहिजे, अन् हे जर टिकविले, मग प्रश्नच नाही. मग, मन गढूळ होईल का?
बाबा – मन गढूळ होते कारण हा संसार आहे ना?
विठ्ठल – एका भक्ताने म्हटलेले आहे, “दिल गया तो जाना दे | मत जाना दे शरीर || ना खेचेगा कमान | तो कहा से लगेगा तीर ||” त्याचे शेले मी विणले, ते का? चोखोबा संगे ढोरे ओढली, जनाची लुगडी धुतली याची कारणे कोणती? मग आताच्या सेवेकऱ्यांची कामे करायला जड पडतील काय?
संशय कल्पना यामुळे त्यांना शंका येते. जोपर्यंत संशय, कल्पना रहित होत नाही, तोपर्यंत भक्तीत रममाण होणे शक्य नाही. सद्गुरुनी अखंड ठेव दिली. सर्वस्व दिले? पण शंका ती आली. का? तर मन गढूळ झाले. मग सद्गुरूं पेक्षा आणखी एक तत्व जगात आहे का? तर नाही.
मन सद्गुरु चरणात निमग्न करण्याचा प्रयत्न करा, तदनंतर आकारी आणि निराकारी कळेल. सद्गुरु चरणात निमग्न झाल्यानंतर मग एकादशी याचा अर्थ कळणार नाही का? दहा इंद्रिये मनाच्या ठिकाणी लय करणे अन् ते मन सद्गुरू चरणावर वाहिल्यानंतर मग अकरावे ठिकाण वेगळे आहे का? हे सर्वस्व बहाल केल्यानंतर त्रिकुटी स्थिर होते. तिथून मन अकराव्यात लय होते. हीच एकादशी, मग एकादशीचा अर्थ कळेल की नाही?
बाबा – १० + १ = ११ त्या एकाचाच अंत घेणे. त्याच्यानंतर एकादशी म्हणजे १० + ० + १. शून्य म्हणजेच ओंकार !
विठ्ठल – या सेवेकऱ्यांना आसनावरून गणित रूपाने सांगितले. मग कृतिमान होण्याचा प्रयत्न सेवेकर्यांनी करणे. १ म्हणजेच आकार ! तोच ॐ कार ! म्हणजे एकातच एक मिलन झाल्यानंतर मग सर्व एकच ! शेवटी तो ही एक लय होतो. मग निर्गुण निराकार ! त्यांनी अनंत तत्वे या पृथ्वीतलावर फेकली आहेत. त्यांच्याकडून ते कार्य करून घेतात. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने आपले कर्तव्य काय? आपण कोण? कोणत्या ठिकाणी शरण आहोत? हे ओळखून कृतीमान होण्याचा प्रयत्न करणे. (समाप्त) ©️
