बोलांची टोचणी करून अजूनही सेवेकरी सागरातल्या जलाप्रमाणे होत नाहीत. हो ! पण सागरातील जल खारट असते. प्रत्येक सेवेकरी खारट झाला, तर कसे जमणार? पण त्या सागरासारखे तरी सेवेकरी आहेत का?
भक्ती ही साधी, सोपी अन् सुलभ आहे. पण त्या भक्तीची लाज राखणे दुरापास्त आहे. भक्तीला तेज आणणे सेवेकऱ्यांच्या हातून होत नाही, म्हणून सेवेकरी फसतो. वाट चुकल्यानंतर त्याला ठेचा लागतात. मग त्यात दोष कोणाचा आहे?
गुरुवारच्या दरबारात आपण विचारले होते, “प्रेमसूत्र नेतो तिकडे जातो हरी”, मग या दरबारात एका छायेखाली असलेल्या सेवेकऱ्यांचे प्रेम फार उतू चालले आहे नाही का? मग मी कोणत्या सेवेकर्याकडे वळावे? या ठिकाणचे सेवेकरी एकाच प्रेमसूत्रात आहेत का?
अजून भक्ती प्रेमात निमग्न होण्याचा प्रयत्न करा. एकाच पित्याची तुम्ही लेकरे आहात. या सृष्टीतील सर्व लेकरे जरी त्यांची असली तरी ते दूर का अन् तुम्ही सानिध्यात का? अजून विचार करा. इतकेही करून गंगेत वाहिल्या सारखे होईल.
देशावरून एका सेवेकऱ्याचे पत्राद्वारे संदेश येतात, त्याला तुम्ही हसता हे बरोबर दिसते का? आसन जागे नाही झोपले आहे का? हा दरबार हसण्याचा आहे का? हसत होता मग मुख्य ज्योतीने रोखले का नाही? ज्यांना तुम्ही शरण आहात, ते आपमतलबी आहेत का? मग का हसलात? ही प्रेम सूत्राची दोरी कोण कुणीकडे नेतो? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे !
या सेवेकऱ्यांना ब्रह्मज्ञान सांगण्याची आवश्यकता नाही. इतकेच मला सांगावयाचे, की सत कर्तव्याने जी ज्योत जाईल तीच फळ चाखील. जी जाणार नाही, त्याच्यासारखा अभागी तोच ! मला या सेवेकऱ्यांबद्दल नाराजी वाटते. छाया काढून घेतली तर मग समजेल काय ते ! मग काहीच राहणार नाही. कोठे काय होईल हेच कळणार नाही. सेवेकरी फार मायावी आहेत. (समाप्त) ©️
