माझी भक्ती करा असे म्हणण्याची काहीही जरुरी नाही. पण जगी कायम टिकणारे कोण आहे? उत्पत्ती स्थिती लय स्थिती कशी होते? हे कोण करते? याची मानवाला जाणीव असावी लागते. म्हणूनच सृष्टीची रचना करावी लागली.
हा आज कालचा काळ नाही. कोणी सांगेल का पृथ्वी कधी निर्माण झाली? कोणी निर्माण केली? असे सांगण्याचे कोणाचेही सामर्थ्य नाही, म्हणून यावर विश्वास ठेवून जे सत तेच या ठिकाणी, तेच नाम, तेच तत्व अखंड आहे. याला कोणी अडविले नाही. म्हणून कोणा एका संताने सांगितले, “नाही घडविला, नाही बसविला”, मात्र भक्ताचे कोडकौतुकासाठी सगुण रुपी दर्शन द्यावे लागते. त्यायोगे भक्ताच्या मनाचे सांत्वन होते.
ज्याला भक्ती कळली तो केव्हाही वाद घालणार नाही. काहीजण सांगतात माझ्यासारखा कोणीही नाही. जरी एकाच तत्वाला शरण गेला असला, तरी वाटेल ते बडबडतात. म्हणून अशा मानवाकडे लक्ष देणे चुकीचे आहे. ज्याने आत्तापर्यंत अहंकार मारला नाही, तो काय भक्ती करणार? ज्याला भक्ती कळली, त्यात रममाण झाला, त्याचा अहंकार आपोआप मरतो. जो अहंकाराच्या पाठीमागे लागला त्याला सेवेकरी म्हणता येणार नाही. परक्या ठिकाणी वाद घालतो, ती गोष्ट वेगळ्या प्रकारची आहे. पण गुरु बंधुत्वाच्या नात्यात असताना अहंकाराने वागतो, तो सेवेकरी नाही. ©️
