श्री एकनाथ महाराज – आम्ही, माझ्या समर्थांच्या कृपेने त्यांच्या चरणात लीन होतो म्हणूनच गती मिळते. तेच सर्वस्वाचे निधान आहेत. मी, माझे समर्थ जनार्दन स्वामी, त्यांना मी सर्वस्व वाहिले होते. त्याप्रमाणे आमची ठेवण होती. मग दुसरीकडे भटकण्याची आवश्यकता काय?
ज्या आकाराला शरण तेच ॐ कार स्वरूप आहेत म्हणून,
ॐ कार बीज मात्रेण | नित्यम् ध्यायंती योगिन: || कामदम् मोक्षदम् चैव | ॐ काराय नमो नमः || ॐ कार हे बीज कसे आहे? तेच ते स्वयं तत्व ॐ कार स्वरूप नटलेले आहे. तेच निर्विकार, निराकार असे आहे, म्हणून आकारातच निराकार आहे, म्हणूनच त्याचे वर्णन होत आहे. ॐ कार बीजाची निर्मिती तेथूनच आहे. ॐ तेच सत् ! सत् तेच ॐ !! यात आमच्यासारख्या अज्ञानी सेवेकऱ्याने त्या सताच्या लीलेचा अंत, महिमेचा अंत घेण्याची काय जरूर आहे? असतील ते अनंत लीलाधारी ! आम्हाला एकच सापडला आहे, ते म्हणजे वेदांच्याही बा धरीले हाती ! म्हणून त्यालाच हाती धरले, तर बाकीच्यांची आवश्यकता काय? असे ते सत्, तेच सद्गुरु ! तेच स्वयमेव अखंड आहेत !! तेच ज्योति:र्मय, आकारी व निराकारी ही होऊ शकते. दृश्य आहे तेच अदृश्य आहे, पण धरता येत नाही, पाहता येत नाही, कडकडून भेटता येत नाही, असे ते परिपूर्ण आहे. शाश्वत आहे.
जनार्दन म्हणजे जनाला धन, विद्या देणारे, जनांच्या वेगळे असणारे तत्व ! अनंत रूपाने आहेत ते ! एकच तत्व गुरु स्वरूप नटले आहे ! पण प्रकृती भिन्न असल्याकारणाने पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. समदृष्टीने पाहिल्यास एकच तत्व, ॐ कार स्वरूप नटलेले आहे. प्रकृती भिन्न आहे, परंतु तत्व अभिन्न आहे. अभिन्न दृष्टीने पाहिल्यास, एकच तत्व सर्व ठिकाणी विखुरले आहे (हे पाहता येईल). ज्याला मुक्ती मोक्ष पाहिजे असेल, त्याने सत् सोडता कामाचे नाही. या ठिकाणी महान महान विद्वान पंडित आले, तरी त्यांना चाचपडावे लागेल, हे ध्यानात ठेवा. म्हणजे या ठिकाणी बोलण्यास सुधरणार नाही. कारण या ठिकाणी सताचा वास आहे. पोपटपंची या ठिकाणी चालणार नाही. (समाप्त) ©️
