श्री समर्थ मालिक – नामस्मरण हे साधे सोपे नाही. रस्त्याने चालला तरी लहर लागली पाहिजे. लहर लागली तर पावलोपावली चमत्कार करीन. पण सेवेकरी त्याने हुरळून जाईल. परंतु सेवेकर्याची मनोभावना तशी झाली, तर हे करावे लागते.
सर्व सूत्राची दोरी माझ्या आधीन आहे. काही डोळस आहेत, काही नादातीत आहेत. डोळस म्हणजे सानिध्यात घेतलेले, नादातीत म्हणजे उपासना करणारे. पण त्यांना दाखवणारा पाहिजे, म्हणजे हे नादातीत डोळस होतील. तेव्हा त्यांना समजेल. पंजा मस्तकावर पडला कि ते डोळस होऊन त्या मार्गाने जातील. अशा तऱ्हेने त्यांना भक्तीची खूण सापडली की मग ते सत् भक्तीच्या गतीने जातील. मग मात्र तीर्थ करण्याची अगर क्षेत्रे भटकण्याची आवश्यकता नाही.
मी कोठे आहे हे त्यांना डोळस झाल्यानंतरच समजेल. हे सर्वस्व कोण करील? तर आकारच करील. अशा तऱ्हेने ॐ कार स्वरूप बनला की मग सत मार्गाने वाटचाल करील. काही मानव आड मार्गाने जातात. लोकांना नादाला लावतात. स्वतःचे स्वहित साधतात, पण या ढोंगाने किंवा चमत्काराने मी कधीही सापडत नाही, मिळत नाही. मला रंग, रूप, आकार वगैरे काही नाही. मग मला कसे पकडतील? मला कसे पाहतील? सेवेकऱ्याने हट्टच धरला तर मी दर्शन देतो की नाही? पण कोणत्या रूपाने, हे मी गुप्त ठेवतो. ©️
