श्री समर्थ मालिक – गीतेत म्हटले आहे, “मन्नाथो श्री जगन्नाथो | मद् गुरु श्री जगद्गुरु || सर्वात्मा सर्व भूतात्मा | तस्मै श्री गुरुवे नमः || मग माझा भगवंत वेगळा अन् त्याचा वेगळा असे होईल का? प्रकृती वेगळी असल्याकारणाने विशेष काही वाटते, म्हणून आकार निरनिराळा आहे आणि आकार हाच निराकारापर्यंत पोहचवू शकतो.
मानवांना हे समजत नाही पण बोल आणि प्रणव कोणत्या तऱ्हेत येतात? हे कसे काय आहे, हे जाणणारे जाणतात. ज्याच्या संचितात आहे, तोच घेऊ शकतो. ज्याच्या संचितात नाही तो त्यात रमणार नाही. जी प्रकृती मायेच्या आधीन बनली, त्याला त्याच तऱ्हेने वाट दाखवावी लागते. ज्याला सताची आपुलकी आहे, त्याला त्याच तऱ्हेने वाट दाखवतात.
सर्वस्व मोक्षापर्यंत दाखविण्याचे सामर्थ्य आकारातच आहे. ज्याच्याजवळ साध्य नाही, सामर्थ्य नाही, तो सेवेकर्याला काय दाखविणार? आकार पूर्ण ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय अधिकार वाणी निर्माण होणार नाही अन् तद्नंतरच गती मिळते कि मी कोणाला शरण आहे. ते तत्व कोण आहे? ही सर्वस्व गती मिळते ती कशी?
“प्रत्यक्ष आकाराला स्थूल देही दर्शन मिळते. पण केव्हा आणि कधी? जोपर्यंत ज्ञान दृष्टीने पाहता येत नाही, मग प्राकृत दृष्टीने काय पाहणार? म्हणून प्रत्यक्षात पाहणे अन् अप्रत्यक्षात पाहणे या दोन शाखा आहेत. सूर्य किती अंतरावर आहे, हे वर पाहिल्यानंतर सूर्य पहावयास मिळतो. म्हणून तो हाताला आला आहे कां? पाण्याच्या भांड्यात सुद्धा प्रतिबिंब दिसते. पाण्यात प्रतिबिंब दिसले म्हणून ते हाताला आले आहे काय? म्हणजे पाहण्याच्या दृष्टी दोन आहेत. पण हे सर्व मायेचे खेळ आहेत. मन जर शुद्ध स्फटिका सारखे सद्गुरु चरणांजवळ ठेवले, मग कसेही पहा, काही वेगळे दिसणार नाही. पण असे होणे कठीण आहे. मनाचे हेलकावे खात खात सद्गुरु चरणांजवळ निमग्न होणे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे.
मन कुठूनही आले नाही. मन हे माझ्यापासून आहे असे म्हटले आहे. मन म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण केलेले आहे. मनाचे आणि तत्त्वाचे बोलणे चालणे ओळखा. म्हणून सेवेकऱ्याने अशा तऱ्हेने वाटचाल करणे. मनाने जरी कोलांट्या उड्या घेतल्या, तरी देह सद्गुरु चरणांजवळ घालणे. (समाप्त) ©️
