श्री समर्थ मालिक – ज्या ठिकाणी पाण्याचा जिव्हाळा आहे, त्या ठिकाणी खोदण्याची आवश्यकता असते काय? आपोआपच पाणी दिसते. ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला आहे, त्याला ती आपोआपच मिळते. पण जिव्हाळा मागून मिळत नसतो. मागितला तरी मिळणार नाही. तर तो कर्मसंचिताप्रमाणे मिळतो. ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला, तोच दैवाचा पुतळा आहे. ते बोल कोणी फेकले? ते बोल चुकीचे आहेत का?
ज्याने हा भक्तीचा जिव्हाळा जाणला त्याला कुठेही जाण्याची, भटकण्याची आवश्यकता नाही. मग तो जंगलात, अरण्यात बसतो कां? ज्यांना साधन साधावयाचे, नाव कमवायचे ते जंगलात, गुहेत जाऊन बसतात. केवळ साधन साधण्यासाठी ते जात असतात.
परमेश्वर पाहण्यासाठी ऋध्दी सिद्धी, तंत्र मंत्राची आवश्यकता नाही. ज्याने वेदांचा मुख्य पिताच हाताशी धरला, त्याला इतरांची आवश्यकता काय? म्हणून ज्यांना मी सापडलो, ज्यांनी माझी ओळख करून घेतली, त्यालाच हे वर्म समजले आहे. ज्याला प्रणवाची गोडी आहे, तो कान भरून ऐकू शकतो. तोच मानव सत् मार्गाने, सत् भक्तीने जाण्याचा प्रयत्न करतो. इतरांना गोडी नसते.
अनेक तऱ्हेने अनेक रूपाने ही प्रकृती नटलेली आहे. अनंत तऱ्हेचे मानव अनंत चवीने नटलेले आहेत. तेथे सताचा काय दोष आहे? हा सर्व मायेचा बाजार आहे. हे मायेचे कर्तव्य आहे. मला जर काही करावयाचे असेल तर लाघव तऱ्हेने सूत्र फिरवित असतो. पण सद्गुरूंचे आपल्या सेवेकऱ्याकडे लक्ष असतेच ! (समाप्त) ©️
