Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

आषाढी एकादशी -२-©️

आषाढी एकादशी -२-©️

एकादशी या महान महत्वाच्या दिवसाचा अर्थ काय? प्रथम सेवेकर्‍यांने सत बनण्याचा प्रयत्न करणे. पूर्व संचिताप्रमाणे मानवाने, सेवेकऱ्याने सत् बनण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु तत्त्व कोण आहे? ज्या आकाराला आपण शरण आहात, ते जे तत्व बहाल करतात, चुकलेली जागा दाखवतात, त्यांच्या ठिकाणी रममाण होणे, दहा इंद्रियांचा संयम करून एकाग्र करणे व अकराव्यात लय करणे. निमग्न करणे. मग आपले जे सद्गुरु प्रकाश देऊन आपल्या सुक्ष्माची गती देतात, दाखवितात त्याच्या अनुसंधनाने वाटचाल करणे. दहा इंद्रिये एकत्र करून अकराव्यात लय केल्यानंतर मग आठवण रहात नाही. यालाच एकादशी म्हणतात.

दहा इंद्रिये एकत्र करून अकरावे जे मन त्या ठिकाणी लय करणे येणे नाम एकादशी ! पण ती दहा इंद्रिये अकराव्यात निमग्न करणारे कोण? तर सद्गुरु ! पण ते इंद्रिये निमग्न कसे करतील? लांड्या लबाड्या करून लवकर निमग्न करतील का? मग असेही सेवेकरी या ठिकाणी आहेत. येथील सेवेकऱ्यांची दश इंद्रिये अकराव्यात मिलन झाली आहेत कां? स्वतःचे स्वरूप आपण किंचित पाहिले असाल, पण संपूर्ण पाहिले आहे का?

ज्या वेळेला दहा इंद्रिये एकत्र करून अकराव्यात तल्लीन झालात, स्वस्वरूप प्रगट झाले त्याच स्वरूपाच्या ठिकाणी पूर्णत्वाने निमग्न झाल्यानंतर त्यालाच समाधी म्हणतात. अशी गती मिळाल्यानंतर देव पहावयासी गेलो | देव होवोनची ठेलो || अशी गती मिळते. मग सांगा पंढरीत विठ्ठल आहेत का कुठे आहेत?

आपल्याच हृदयी सद्गुरूंचा वास आहे, मग मन रानोमाळ भटकविण्याची आवश्यकता काय? परंतु ही इंद्रिये केव्हा आणि कधी निमग्न होतील? प्रत्येक सेवेकऱ्याचे मन शुद्ध सात्विक असेल, जास्तीत जास्त सेवेकरी सद्गुरू चरणांप्रत राहीला, तर सद्गुरु दूर नाहीत.

काशी, गया, प्रयाग वगैरे काही नको, कांहीं करण्याची आवश्यकता नाही. पतिव्रता ही पतीला मानण्यावर आहे. स्त्री प्रतिव्रता असली तर परमेश्वर भेटण्यास येतील. असे कितीतरी भगवंताच्या नावाने ओरडत असतील पण कृतिमान कितीजण आहेत?

भगवंताला काय पाहिजे आहे? काही नको. फक्त तुमच्या मनाचा शुद्धपणा, मनाची शुद्ध ठेवन हेच ते पाहतात, बाकी काही पाहत नाहीत. पण इतकेच आहे, मन कसे शुद्ध होईल याचा प्रथम शोध केला पाहिजे. तेव्हा हे मन शुद्ध कोण करणार? सेवेकरी करणार नाही का? तर नाही. मग कोण करणार? तर सद्गुरुं शिवाय हे होतच नाही, कोणीही करु शकणार नाही. ©️

You cannot copy content of this page