मानवाला बुद्धी देणारा कोणीतरी आहे, परंतु कृती करताना, “मी कोणीतरी आहे” अशी त्याची भावना असते. मूर्ती रंगविणे, ती हुबेहुब वटविणे, हे काम तो उत्कृष्टपणाने करतो. पण बुद्धी कुठून निर्माण होते, येते हे त्याला कळत नाही. गणपतीला व्यवस्थित नटवितो, वटवितो, पण जड आकार पाण्यात गेला तरी सूक्ष्म आकार आहे हे कोणी पाहिले आहे कां? तो सूक्ष्म आकार जो आहे, त्याला पाण्यात, अग्नीत, मातीत कोणी टाकू शकत नाही. हे जड स्वरूप जरी पाण्यात टाकले, पण ते पाहता येत नाही. असे जे आहे, त्याला पाण्यात बुडविण्याचे कोणाचेही सामर्थ्य. नाही.
भक्तीसाठी म्हणा, मानवासाठी कोणती ना कोणती रूपे धारण करावी लागतात, पण मला आदी नाही, मध्य नाही आणि अंत पण नाही, मग मला कोण पाहू शकतो? जो सत भक्तीत रममाण आहे, सत गतीने जाणारा आहे, तोच मला पाहू शकतो. अनंत नामाने, अनंत रूपाने नटलेले तत्व सर्वत्र व्यापक असूनही अलिप्त आहे, तरी योगीयांचा योगी जाणे ! इतरांना ते कळणार नाही.
पण हे सर्वस्व ढोंगाच्या खाली मोडले जात आहे. हे सर्वस्व ढोंग आहे. त्यात निष्काम भक्ती आहे का? तर मग दोन आणि चार टाका असे मानव का म्हणतो? याला भक्ती म्हणावी का? अशा ज्योतींना मोक्ष मिळेल का? जर तो प्रेमाने, हौसेने बनवला आहे, मग त्याला पडदा का? आणि पैसा कशासाठी? म्हणून या श्रद्धेला किंमत नाही, अर्थ नाही. आज कालचा मानव रंग, ढंगाला भाळतो. खरा गणपती कुठे आहे याची दाद फिर्याद नाही. (समाप्त) ©️
