मी कोण, कोठे जाणे आहे, कोठून आलो, हे त्याला सापडत नाही. तेव्हा त्याला स्थिर करण्यासाठी तत्वे निर्माण केली. सर्वश्रेष्ठ असे जे पद म्हणजे सद्गुरू पद ! त्यांच्या सानिध्यात गेलात की, त्याचे सर्वस्व शुद्ध होत असते. मानव सत मार्गाने जाता जाता, त्याचे मन पूर्णत्वाने अर्पण होते, अन मग तो त्या ठिकाणी स्थिर होतो. तोच प्रकाश! त्या प्रकाशाच्या अनुसंधनाने सताला ओळखायचे असते. ओळखल्या नंतर कोठे जावयाचे ते त्याला कळेल. तेच सद्गुरु, ही आंधळ्याची काठी बनतात व मार्गदर्शन करतात. तीच ही भक्ती! ती साधी आणि सोपी आहे. तिला धनदौलत नको, गिरी कंदरी जाणे नको. समुद्रात धुंडाळावे लागत नाही. भक्ती हा अखंड झरा आहे. तो अखंड तेवत असतो.
“भक्ती म्हणजे सताला प्रकाशाने ओळखणे” हे घडविण्यासाठी जो मार्ग, तिच भक्ती. भक्ती हा राजमार्ग आहे. या मार्गाने जो जाईल तोच भक्त, तोच संत, तोच सतपुरुष, त्याला कोणतेही नामाभिधान द्या.
महान ऋषी, मुनी, साधू, संत यांनी हेच केले आहे. समानता जागृत ठेवून जे आपल्यात आहे तेच सगळीकडे आहे, हे ओळखण्यासाठीच काठीचा आधार घेतो अन् प्रकाशाच्या अनुसंधनाने ओळखतो. त्याला काहीही नको. त्याला एकच, सत मनाची त्या ठिकाणी जरूर आहे. तेच मन सत चरणावर अर्पण करणे अन सद्गुरु सानिध्यात रममाण होणे. यालाच भक्ती म्हणतात. त्याला वेळ काळ, ठावठिकाणा याचे बंधन काही नाही. कोणत्याही रूपाने करायचे ते करा. साधन ही खूण आहे. साधन आणि सिद्धता, हे साधण्यासाठी गुरु सानिध्यात रममाण होणे. जे महान रूप तेच सदगुरू! त्या जगत् नियंत्याला डोळे भरून पाहण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. ते कशासाठी? सद्गुरु दूर नाहीत. फार फार जवळ आहेत. फक्त दृष्टी शुद्ध सात्विक पाहिजे. ज्याची बुद्धी अशी आहे, तोच शुद्ध सात्विक सेवेकरी! (पुढे सुरु…३)©️