श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –
“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्या (सद्गुरुं) जवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते अन हाच राजमार्ग सेवेकरी चुकला तर मग सेवेकऱ्याची कशी प्रगती होईल? म्हणून सद्गुरु मार्गदर्शन करीत असतात.
भक्तीनेच सेवेकरी पुढे जाऊ शकेल, स्वतःची प्रगती साधू शकेल. तपश्चर्येने हे साध्य होणार नाही, मिळू शकणार नाही. तपश्चर्येने अनंतांना प्राप्त करून घेऊ म्हणाल तर कितीही जन्म घेऊन देखील हे शक्य होणार नाही. अनंत दर्शन मिळणे कालत्रयी शक्य होणार नाही. परंतु भक्तीने मात्र तुम्ही त्यांना थांबवू शकाल, पाहू शकाल.
धन संपत्तीत देखील फरक आहे, एक सात्विक संपत्ती आणि एक अघोर संपत्ती. कष्ट करून, कर्तव्य करून किंवा जी वडिलोपार्जित प्राप्त झाली ती सत संपत्ती. परंतु इतरांना त्रास देऊन, खोटे बोलून, विश्वासघात करून प्राप्त झाली ती अघोर संपत्ती! सात्विक संपत्तीला विचार असतो, अघोर संपत्तीला विचार कुठला? अघोर संपत्ती कमवणारे, अघोर अविचाराने पाहणार! कितीही अघोर संपत्ती एखाद्याकडे असली तरी अंतिम त्याची अधोगतीच होणार! परंतु भक्ती मार्गाने जाणारे, सत संपत्तीचा संचय करणाऱ्यांच्या ठायी मात्र शांती, समाधान आणि प्रगतीच असणार! सात्विक संपत्तीला पुरवणी असते. अघोर संपत्तीला पुरवणी नसते. अघोर संपत्ती ज्याच्याजवळ असते त्यांच्याजवळ समाधान कधीही नसते. परंतु सात्विक संपत्ती ज्या ठिकाणी असते तेथे सदैव समाधान असते. समाधान हीच खरी आपली लक्ष्मी आहे. भक्तीचे मूळ अंग म्हणजे समाधान! समाधानी वृत्तीच मानवाजवळ हवी…©️
