श्री स्वयंभू – श्री हरि म्हणा, वासुदेव म्हणा, नमः शिवाय म्हणा, काही म्हणा हे सर्वस्व असले तरी, ते सर्वस्व एकाच चरणाजवळ लिन आहेत हे पाहणे आहे. सर्व देवाधिदेव श्रीहरी, महादेव कुठे लिन आहे तर एकाच चरणाजवळ ! तेच चरण जर सापडले तर तो महद भाग्यवान आहे. त्याच चरणांचे आपण सेवेकरी, दास, रज:कण आहोत. ते चरण म्हणजे सद्गुरु आहेत. ते सहज मिळणार नाहीत. ज्याला ते मिळाले, त्याला ते पाहता येत नाहीत. टिकवता येत नाहीत. त्याचा शोध कोणी घेतला नाही. त्यांना कोणी धरू शकत नाही. ज्यांनी शोध घेतला ते त्या ठिकाणी लिन झाले.
सर्वस्व जगताचा कारभार ओंकारांच्याच अलीकडे आहे. त्याच्या पलीकडे नाही. ओंकार नटवणारे तेच ! अन ओंकाराच्या पलीकडेही तेच आहेत.
ज्या वेळेला मानवामध्ये अतिरेक होण्याचा संभव असतो, त्या वेळेला अशी गती नटवावी लागते. अखंड पदाचा ध्वनी मला सुद्धा कोणीतरी दिलेला आहे. मी प्रत्यक्ष स्वयंभू नसून, जे स्वयंभू आहेत त्यांनीच मला जगताचा कारभार म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय यापैकी एक तत्व बहाल केले आहे. लय हे तत्त्व माझ्याकडे दिलेले आहे. हे जरी दिले असले तरी संहार कसा? आणि कोणाचा हे शास्त्र वेगळे आहे. मला जरी ते कर्तव्य दिले असले तरी, त्याचा आराखडा आधीच तयार केलेला असतो. जरी हे कर्तव्य मला दिले असले तरी मी प्रत्यक्षात जात नाही, तर दूताकडून करविले जाते. म्हणजेच यमराज करून घेतात. ८४ लक्ष योनीची जी जी गती त्याप्रमाणे आक्रमण करून, दूता करवी कार्य करून घेतात, पण ज्या वेळेला अघटित कार्य असेल त्यावेळेला मला संदेश येत असतात. म्हणून कर्तव्याचा जो प्रत्यक्ष भाग तो मला करावा लागतो. बाकीचे कार्य यमराज करून घेतात. शक्ती जर काही करीत असेल, तर ते माझ्याकडे येतात. शक्ती म्हणजे पार्वती. यमराज, दूत, शक्ती असे यांचे संबंध येतात. त्या वेळेला ते आपापसात ढवळाढवळ करीत असतात. माझ्यापर्यंत येऊ देत नाहीत. कारण मी ध्यानमग्न झाल्यानंतर, मला काही गती मिळत नाही व गती घेण्याचा प्रयत्न करीत नाही. ज्या वेळेला त्यांचे प्रत्यक्ष आदेश येतात, त्यावेळेला जागृत होऊन कार्य करावे लागते, मग ध्यान वगैरे नाही. समाप्त ©️