श्री समर्थ मालिक – सेवेकऱी प्रवचन ऐकतात, पण त्याप्रमाणे कोणी सेवेकरी चालतात का? आदेश मानतात का? मनात रुजू करून घेतात का? सत् हे कोणाकडून काय करून घेईल हे सांगता येणार नाही. तुम्हाला सांगून ते करून घेईल का? तर नाही. सेवेकऱ्यांच्या मनात शंका कुशंका का येतात?
या दरबारात काय चालते हे मी पूर्णत्वाने जाणतो. सेवेकर्यांची मने शुद्ध किती आहेत हे पण जाणतो. यात सद्गुरूंचा दोष नाही. सेवेकरी आपल्या कृतीचे फळ आपल्या ओटीत घेतो. सेवेकरी फसतो तो कशामुळे फसतो? काय कारणाने वाहत जातो? तर मनात शंका आणतो म्हणून फसला जातो, त्यात सताचा काय दोष आहे?
अनेक वेळेला सांगितले, मला आदी अंत काहीही नाही. ॐ कारांचा कोणी अंत घेतला आहे का? जे अखंड तत्व बहाल केले आहे, त्यात किती सेवेकरी रममाण झाले आहेत? एक एक तप झाले तरी शंका रहित होत नाहीत. शंकेला डावलू शकत नाहीत, मग हा सेवेकरी कसला? असत कृतीचा खजाना सेवेकरी वाढवू लागला, तर माझा त्यात काही दोष आहे कां?
आसनाधिस्त काही गोष्टी बाहेर कुणाला सांगू नका म्हणून सांगत असतात, त्या तुम्ही उघड करता. ज्यांनी मस्तकी हस्त ठेवला, त्यांचा शब्द तुम्ही मानला आहे का? त्यांचा शब्द तुम्ही अव्हेरता.
एका तत्त्वाचे सेवेकरी, एका सद्गुरूची लेकरे असताना सेवेकऱ्यांची मने अजून गढूळ का आहेत? केव्हा शुद्ध होतील? बोलांची टोचणी करून अजूनही सेवेकरी सागरातल्या जलाप्रमाणे होत नाहीत. हो ! पण सागरातील जल खारट असते. प्रत्येक सेवेकरी खारट झाला, तर कसे जमणार? पण त्या सागरासारखे तरी सेवेकरी आहेत का? विशाल ! ©️
