मायेत, संसारात लपेटल्यानंतर, ब्रह्म आधी का माया आधी? ब्रह्माच्या मागे लागल्यानंतर माया पाठीशी येईल. म्हणूनच सत भक्ती हीच अद्वैत भक्ती आहे. अद्वैत भक्तीने जाईल, त्याला सर्व ठिकाणी एकच दिसेल. सताची गती घेतल्यानंतर ते जगभर कसे वावरते ते समजेल. सद्गुरु सर्व ठिकाणी फिरवित असतात.
आपण आपल्या सद्गुरु चरणात निमग्न होऊन पुढे पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सद्गुरु सर्वस्वाची गती दाखवितात. पण सेवेकरी संशयरहित झाला पाहिजे. गती जरी मिळत असली तरी त्याने आपल्या कर्तव्याप्रमाणे सत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. माऊली फसविते का कोण फसविते याची छाननी करावी. या विषयावर जे थोडे चार शब्द सांगितले त्यावर सेवेकरी लक्ष ठेवतील अशी मी अपेक्षा करावी का?
ब्रह्म म्हणजे काय? आपण ज्यांना शरण तेच आपले सर्वस्व परब्रम्ह होय, याची गती घेण्याचा सेवेकर्यांनी प्रयत्न करावा. मी ब्रह्म आहे असे नुसते म्हणून चालेल का?
अहं ब्रह्मास्मि ! त्या ठिकाणी अहम, पण ज्या ठिकाणी ब्रह्म त्या ठिकाणी आहे. मी काही येत नाही. ते सर्व ठिकाणी व्यापक आहे. म्हणून सेवेकऱ्याने याच्यावर शोधन करा कि याच्याही पलीकडे आणखी सत आहे. सेवेकर्यांनी चिकित्सा करावी. काही मानव म्हणतात, आपणच सर्व सुचवता पण मी करून अकर्ता आहे. जे माझ्या आधीन नाहीत, त्यांना मी सांगत असतो का? मात्र चेतना आहे म्हणून मी सांगत आहे असे म्हणतात. पण काही सेवेकरी म्हणतात, आपणच सांगता, सुचवता, दाखवता. तेव्हा सेवेकऱ्यांनो सद्गतीने चालण्याचा प्रयत्न करा. आपल्या सद्गुरूंना विचारणा करावी, गती आपणच देतात की दुसरे कोण देते? हे विचारण्याचा प्रयत्न करावा. (समाप्त) ©️
