श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –
शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास हा होणारच! काही शारीरिक त्रास झाला, काही प्रसंग ओढवला तरी देखील मन बेचैन होतेच! अशा वेळी मन शांत राहते का? मन बेचैन झाले की शरीर बेचैन होते आणि शरीर बेचैन झाल्यावर मन देखील बेचैन होते. जर तू आपले मन दृढ श्रद्धेने सद्गुरु माऊलींच्या चरणांवर पूर्णत्व अर्पण केलेस तर सद्गुरु तुला अशा व्याधींपासून दूर ठेवतात आणि मन सद्गुरु चरणांवर अर्पण करताना काही हातचे राखून केलेस तर त्याची बेरीज वजाबाकी त्याच तऱ्हेने होणार की नाही?
हे मना तुझ्या ठिकाणी सद्गुरूंबद्दल का सद्भावना निर्माण होत नाही? माझ्या सद्गुरूं बद्दल, हे मना तू मागेपुढे का होतोस? आपणच आपल्या मनाला असा प्रश्न करावा. आपले जे सद्गुरू आहेत ते प्रत्यक्ष अनंत तत्वाशी, परम तत्त्वाशी व्यवहार करतात. त्याकरिता, हे मना, तू साशंक का असावे? सद्गुरूंच्या प्रणवाला अनंत किंमत देतात, साक्षात गुरुदेव पितामह (वशिष्ठ गुरुदेव) किंमत देतात, महान महान तत्वे किंमत देतात अशा ठिकाणी हे मना तू का स्थिर होत नाहीस? माझ्या सद्गुरुंबद्दल तुझ्या मनात का आदरभाव निर्माण होत नाही? हे मना, तू ठाम, निष्काम गतीने का वाटचाल करीत नाहीस? महान महान तत्वे, ऋषीमुनी ज्या माझ्या सद्गुरूंच्या चरणांवर लीन आहेत त्या सताच्या, सद्गुरूंच्या चरणांवर हे मना तू का बरे लीन होत नाहीस?…©️
