श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –
काही काही मानव असे विपरीत वागत असतात आणि विचार करतात की मी जे काही करतो आहे ते कोणाला कळणार आहे? परंतु तुमच्यात जे सत आहे, जे अविनाशी आहे, त्याला मात्र पूर्णत्व जाण असते. अरे! जे अनंत, अविनाशी सत आहे त्यांचे लक्ष सूक्ष्म होऊनही सूक्ष्म असलेल्यावर असते, तर तुमच्यावर त्यांचे लक्ष असणार नाही का?
अरे अनंत तत्व कसे आहे? तर सर्व व्यापून अलिप्त तत्व आहे. सर्व ठिकाणी विखरून देखील अलिप्त आहे. मग असे हे जे विखुरलेले तत्त्व आहे त्यांच्या नजरेतून काही सुटणार आहे का? अरे सेवेकऱ्यांनो तुमच्या आमच्यात सर्वस्व एकच तत्व भरून उरले आहे. फक्त आमच्या प्रकृतीत फरक आहे. मग आता तुम्हीच सांगा जे आतमध्ये वास करीत आहे ते तुमची कृती, क्रिया, कर्म जाणते की नाही?
हे मानवा, हे सर्वस्व तू गुप्त ठेवतोस, हे मना तू हे कळू देत नाहीस. सेवेकर्यांनो तुमच्यावर प्रसंग आल्यानंतर मग सेवेकरी आसनाजवळ गयावया करू लागतो आणि सांगतो,”बाबा यातून केवळ आपणच मला सोडवू शकाल”.
सद्गुरु हे दयाघन तत्व आहे. ते सर्वस्व विसरून आदेश देतात. सेवेकर्याला प्रसंगातून सोडवून मार्गस्थ करा. असे हे जे दयाघन तत्व आहे, आणि अशा या दयाघन तत्वाच्या ठिकाणी तुम्ही शरण आहात, मनाने शरण आहात की शरीराने शरण आहात? मनाने शरण आहोत असे म्हणता, तर काहीजण शरीराने शरण आहोत असे म्हणतात. काही जण म्हणतात आम्ही मनाने आणि शरीराने शरण आहोत, तर काही सेवेकरी म्हणतात आम्ही तिन्ही अंगानी शरण आहोत…४
