श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – हा एक महान राजमार्ग आहे. तेथे काटे, खाचखळगे, खड्डे काहीही नाहीत. इतर मार्गाप्रमाणे हा मार्ग नाही. हा अत्यंत साधा सोपा सरळ मार्ग आहे, पण दोन्ही टोके सांभाळायची असतात.
आपण जाणताच की हाताच्या बाजू दोन, एक उजवी अन दुसरी डावी. त्या दोन बाजूंमध्ये उजवा गट भक्ती आणि डावा गट तामस, हटयोग, प्राणायाम. ही तामस लोकांची भक्ती आहे. तंत्र मंत्र, ऋद्धी सिद्धी ही सर्व तामस लोकांची उपासना.
भक्तीयुक्त उपासना कोणती? तर अखंड नाम! त्या परते दुसरे काही नाही. जे सत पदाचे अखंड नाम सतपदाच्या आसनावरून बहाल केलेले आहे त्याचेच नामस्मरण करणे आणि त्यांच्याच दर्शनात दर्शन युक्त राहणे, हेच त्याचे मर्म! अशा स्थितीत राहिले ते ऋषीमुनी, ब्रह्मऋषी, सप्तऋषी आणि त्यांची गुरुकुले! अन या चौकट मुनींच्या-कोपीष्ट मुनींची, तामस मुनींची गुरुकुले त्यात शुक्राचार्य, दुर्वास, विश्वामित्र अन त्यांची गुरुकुले, राक्षस अघोर ज्यांना संजीवनी मिळाली होती. ही वेगळी चाकोरी आणि भक्ती ही वेगळी चाकोरी!
तामसी वृत्तीच्या लोकांचा ताफा मोठा होता. त्यांच्या बाजूला भरपूर अघोर होते. परंतु ब्रह्मर्षी, सप्तऋषी यांचा ताफा मात्र लहान होता, परंतु तेजस्वी होता. तेजोबला सहित होता. याचे कारण सत कोणाच्या बाजूला होते तर सात्विकांच्या! सत त्यांनाही (तामसी वृत्तीच्या लोकांनाही) सांगत असे की मी तुमच्या बरोबर देखील आहे. कारण दोन्ही प्रवृत्ती – सत आणि तामस, असलेले लोक हे त्यांचे भक्त होते. दोन्हीही सताचेच भक्त. तामसी लोकांची विपरीत बुद्धी तर सात्विकांची सरळ बुद्धी! म्हणजेच भक्तीचा मार्ग साधा सरळ पण राजमार्ग!…©️
