श्री समर्थ मालिक – मी कसा आहे? अंगुष्ठमात्र आहे. अंगुष्ठमात्र म्हटले आहे. जसे म्हणाल तसा आहे. तर कसा आहे? चिन्मय आहे. चैतन्यमय आहे. चैतन्यमय स्थिती नसेल तर सेवेकरी काही करू शकेल का? या चिन्मय स्थितीवर कोणाचा भरवसा आहे, तर कोणाचा नाही. मग मी कसा आहे? मला आदी नाही, मध्य नाही आणि अंत पण नाही. रंग नाही, रूप नाही. मग मी कसा आहे? कल्पना संशय काही नाही.
असे जर आहे मग मी कसा आहे? हे तरी सिद्ध कसे होते? मी आहे हा सिद्धांत कसा? कोणीतरी संतांनी डोळे भरून पाहिले आहे. अनुभवले आहे. तेव्हाच त्याने सांगितले की नाही, मी आहे म्हणून? म्हणून आहे हे सिद्ध आहे. पहिल्याशिवाय कोणी आहे हे म्हणत नाही. एवढेच, सेवेकरी त्याचा अनुभव घेऊ शकतो. पाहू शकतो. आज ना उद्या त्याला दर्शनयुक्त करावे लागते. दर्शन द्यावे लागते. ते कसे?
मला रूप नाही, रंग नाही, आकार, विकार काहीही नाही. अशांची गती कोणी दाखविली? मग सद्गुरु आकारी आहेत का निराकारी आहेत? त्यांना अधिकार असल्याशिवाय दाखवतील का? आकाराने दाखविले, मग कोणाचे दर्शन घेणार? सद्गुरु रूपात ते दर्शन मिळाले आहे का? तुमचे सद्गुरु तेथे नसल्यावर, तुम्हाला दर्शनयुक्त कोण करतो? “जन्माचे ते मूळ पाहिले शोधून” ज्याने जन्माचे मूळ शोधून पाहिले, तो कशात बाकी आहे का? ते वर नव्हते. आकाश नव्हते. पाताळ नव्हते. पृथ्वी नव्हती. आले काय? कसे झाले? ©️
