सद्गुरु हेच तत्व, मी कोण आहे, याची जाणीव करून देऊ शकतील. सद्गुरु पद हेच सर्व श्रेष्ठ आहे. याच्या पलीकडे काहीं नाही.
आतापर्यंत जे झाले, ते सद्गुरु माऊलीच्या कृपेनेच झाले. त्या गुरू माऊलीच्या कृपे शिवाय काहीच करता येत नाही. मी काय सांगतो याचे मुळीच भान नाही. बोलविता धनी वेगळाच आहे. कोण बोलतो याची जाणीव रहात नाही. हा दिवस अखंड दर्शनाचा असतो. यामुळे जे काही घडले, ते आपल्या चरणांशी रुजू केले आहे.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी !
तेणे मुक्ती चारी साधियेल्या !!
देवाचे द्वार कोणते? देव म्हणजे कोण? याचा प्रथम शोध घेतला पाहिजे. प्रत्येकाने आपण काय करायला पाहिजे ह्याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक मानव प्राणी षड्रिपूच्या जाळ्यात, मायावी तत्वात गुरफटलेला आहे. हे मायावी बंधन तोडून त्या पदाच्या शोधाची धडपड केली पाहिजे. ती धडपड कोणत्या तऱ्हेची असावी? जो आचार विचार, मनाचा व्यापार सद्गुरु चरणांवर अर्पण करतो, तोच देवाच्या द्वारी जावू शकतो. तेथें जाण्यासाठी मार्ग म्हणजे सतभक्ती ! कोठेही जा ! मार्ग वेगळा नाही. फक्त सद्गुरु चरणांचे ध्यान करायचे. त्या चरणापाशी मन पूर्णत्व लीन झाल्यावर, एकाग्र झाल्यावर, त्या द्वारी एक क्षण का होईना उभे राहिल्यावर आपली प्रकृती सद्गुरु चरणी लीन होते व अखंड तत्व प्रगट होते. त्या ठिकाणी लीन झाल्यानंतर कोणत्या मुक्तीचा शोध घ्यायचा?…… पुढे सुरू ©️