श्री संत नामदेव महाराज – ज्याने या सर्वस्व ब्रह्मांडाची रचना केली, आकाश, पृथ्वी, सर्वस्व सृष्टीची रचना केली, ते तत्व आमच्या सारख्या अज्ञानी सेवेकऱ्यांना म्हणतात, “काहीतरी सांगा.” पण मी काय सांगावे? अनंत लाघवी तत्व, न धरता येणारे, न सापडणारे, अशांचे गुणवर्णन करणे, त्यांच्याविषयी भक्तीयुक्त प्रवचन सांगणे, म्हणजे त्यांच्या भक्ती विषयी मी काय सांगणार? माझ्या सद्गुरुं पेक्षा दैवत श्रेष्ठ नाही.
हल्लीच्या परिस्थितीमध्ये भक्ती करण्याची सर्वांना आवड असते, त्यात एकच, कुणाला गुळाची चव, तर कुणाला साखरेची चव असते, कुणाला खमंग आवडते, तर कुणाला तिखटाची गोडी असते, कुणाला कशाची, तर कोणाला कशाची? अन् अशा तऱ्हेने मानव वाटचाल करीत आहे. ज्याला माहित आहे की हे पदार्थ कशापासून होतात, त्याने त्या निर्माण कर्त्यालाच पकडलेले असते.
दुसरी गोष्ट, रुधिरात दुधाचे मंथन करून शुभ्र केले आहे. कोणाला दुधाची, तर कोणाला ताकाची चव असते. ताक हे सर्वस्व शुभ्र आहे. दुधाला विरजण घातले की दही होते. त्याला आंबट वास येतो. त्याचे घुसळण केले की ताक बनते अन् लोणी वर येते. ते पण शुभ्रच असते. आता या तिन्ही वस्तूंचा कधी सुगंध सुटला आहे का? तद्नंतर तेच लोणी एखाद्या भांड्यात घालून अग्निवर ठेवले की मग सुगंध सुटतो. तो कुणी पकडला आहे का? असे जे सत आहे, ते सुगंध युक्त आहे. ते कोणाला सापडले आहे का? जे त्या ठिकाणी लयबद्ध झाले, ते परत आले नाहीत. म्हणून सद्गुरु हे सर्वस्वाचे निधान आहे. ते वाटेल त्या तऱ्हेने कस घेतील. पण सेविकाऱ्याला वाया घालविणार नाहीत. अत्यंत दयाघन असे ते तत्व आहे. त्यांच्या लिलेचा अंत नाही. ज्यांना ते सापडत नसेल, त्याने सुगंधात तरी निमग्न होण्याचा प्रयत्न करणे ही विनंती आहे. (पुढे सुरु…२)©️
