अखंड शक्तीची, महान शक्तीची ओळख करून देणारे व चुकलेली जागा दाखविण्यासाठी कोणीतरी आकारी असावा लागतो. मग दैवत श्रेष्ठ का चुकलेली जागा दाखविणारे श्रेष्ठ? मी जर श्रेष्ठ म्हणावे, तर मी कोणाला तरी शरण आहेच. मग मी श्रेष्ठ कसा?
अनंत लाघवी शक्ती आहे. ती लाघव करावयास लागली, तर अंत मिळणार नाही. थोडीशी अहंकाराची झलक आली की असे होते. या अहंकारात ओळख राहत नाही. ज्याने सृष्टीची रचना केली, ज्याला रंग, रुप, आकार वगैरे काही नाही, सर्व ठिकाणी व्यापक असूनही अलिप्त असणारे जे परम निधान तत्व, त्या तत्त्वापुढे आम्ही तुच्छ आहोत. भक्त करणे न करणे हा त्यांचा अधिकार आहे.
हल्लीचा काळ फार वेगळा आहे. कारण थोडेसे शिक्षण झाले की त्यांना वाटते मी कोणीतरी विशेष आहे. कलीयुगात हवा कशी आहे, ते मी सांगतो. हे कलियुग आता कलू लागले आहे. कोणीतरी भक्ताने माझे दर्शन घेतले आहे का?
सतभक्त असेल तर त्याला पंढरपुरला येण्याची काय गरज आहे? जो निष्काम सतशुद्ध भावनेने त्या ठिकाणी येतो, त्याला मी अवश्य भेटतो. सकाम गतीने येणारे किती आहेत, तिकडे मी लक्षच देत नाही. एकच तत्व अनेक नावाने, अनेक रूपाने नटलेले आहे. तेच ते आहेत, आम्ही नव्हेत. जन्माला आल्यानंतर नाव गाव काही नसते. पण नंतर तुम्ही ठेवता. तेव्हा येसी उघडा, जासी उघडा! येताना काही नाही, अन् जाताना पण काही नाही. कांहीतरी सांगाती घेऊन जा. ते काय? याचे शोधन तुम्ही करा.जे जन्मोजन्मीचे सुटत नाही, ते काय आहे, ते आपण सांगा. (समाप्त) ©️
