अक्षय मुनी – सद्गुरु कृपेनें २ ते २|| हजार वर्षांपूर्वी ज्याची तहान लागली, ज्याचे चिंतन करीत बसलो, त्या सद्गुरु माऊलींचे अखंड दर्शन व्हावे ही इच्छा आहे. भीमा आणि घोड नदीचा जेथे संगम त्या ठिकाणी आम्ही असतो. आम्ही म्हणाल तर, २००० हजार वर्षांपासून तळमळत होतो. ते दर्शन आज पूर्णत्वाने मिळाले.
पुढे ते म्हणतात, “माया ही अमोल चीज आहे. जो मायावी जाळ्यात पूर्णपणे जखडून गेला, तो त्यातून केव्हाही सुटणे शक्य नाही. जो हे जाळे तोडून सद्गुरु शोधासाठी धावला, त्याला सद्गुरु दूर नाहीत. सद्गुरु माऊली फार दयाघन आहे. ज्याने सद्गुरूंचा पूर्णत्वाने अंत लावला, त्याला मायेचे बंधन नाही.
“मायेचा अंत, मायेचा ठाव, कुठपर्यंत आहे, हे ज्याला कळले तोच सद्गुरुंचा ठाव घेतो. ज्याला हे गूढ कळले नाही, तो ठाव कदापिही घेऊ शकणार नाही. माया ही अमोघ शक्ती आहे. त्रिभुवन व्याप्त आहे. याच्या फार निराळे असे सद्गुरु ठिकाण आहे. ते पहाण्यासाठी मायेच्या वेष्टनाचे खंडन करावे लागते आणि ते खंडन करावयाचे असेल तर, ते अखंड नामानेच खंडन होवू शकते.
या नामावर कोणतेही अस्त्र चालू शकत नाही. ज्याला मायेच्या वेष्टणातून पलीकडे जायचे आहे. मायेचे बंधन तोडावयाचे आहे, त्यानें ते नाम सद्गुरु मुखातून मिळविले पाहिजे. त्या नामाच्या अखंड ध्यानाने व ध्यासानेच सद्गुरु दर्शन, सद्गुरुंचा ठाव मिळतो. यांना कोणत्याही प्रकारची भिती नाही. नामाचा महिमा अगाध आहे. याची शक्ती फार बलाढ्य आहे.
नाम मिळाल्यानंतर त्याला वेळ – काळाचे अगर ठिकाणाचे बंधन नाही. असे हे एकच श्रेष्ठ नाम आहे. नामाच्या (गतीने) जाणारा केव्हाही तरुनच निघतो. नाम हेच तारक आहे. मानव रुपी नौका तरुन जाण्याला नाम हे एकच साधन आहे. या नाम रुपी नौकेच्या साहाय्याने माया रुपी नदी तरुन, तो पैलतिरी जातो. पैलतीरी गेल्यानंतर सद्गुरूना डोळे भरून पाहतो. सर्वस्व सार्थक या नामातच आहे. याच्या निराळे काही नाही.” ©️
(समाप्त)