श्री समर्थ मालिक – प्रणव निर्माण कसा होतो? कोठे जातो आणि कोठे लय होतो? प्रणव जो आहे तो अखंड आहे. अखंड अखंडात विलीन होते. प्रणव आकारी पण आहे आणि निराकारी पण आहे. प्रणव जर बंद पडला तर बाकी काय चालते का? तर नाही. मी जो आहे तो नामातच आहे. क्षरातही आहे, अक्षरातही आहे. चरात पण आहे अन् परात पण आहे. मग आणखी काय पाहिजे? मग प्रणव कोठे जातो? कळत नाही.
बोल बोलातून निघत असतो. चैतन्य निर्माण चैतन्यापासून होते. वेदना झाल्या की बोल बाहेर पडायला सुरुवात होते. चंचलता वाढली की बोल बाहेर पडतात. दाबून ठेवले तरी किती दिवस ठेवणार? इतकेच आहे की, सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म प्रणव ती म्हणजे हवा.
येथे सर्वच सेवेकरी आहेत असे काही नाही. तत्वाला बांधून घ्यावयाचे ते भक्तीने बांधून घ्यावयाचे असते. भक्तीने बांधून घेतले तर आपोआपच गती मिळते. विचारण्याची सुद्धा गरज नाही.
भक्ती ही सोपी तितकीच कठीण देखील आहे. सेवेकरी म्हणा अगर मानव म्हणा टिचभर पोटासाठी अनेक व्याप करतात. त्यातूनच हे सर्व चाललेले आहे. सेवेकऱ्यांची मनें स्थिर आहेत का? भगवंताला बांधावयाचे असल्यास भक्तीने बांधा. मग सत कोठून प्रगट होते आणि कोठे जाते अन् कोठे लय होते हे समजेल. पण यातूनही जे वेगळे आहे ते सापडणे कठीण आहे. त्यातच लय झाल्यानंतर सांगण्याची आवश्यकता नाही. विचारण्याची ही आवश्यकता नाही. लय झाल्यानंतर सांगता येणार नाही, आहे हे सतच आहे. नामाचा उजाळा केल्यानंतर ज्ञानात आपोआप भर पडते. ज्ञान म्हणजे प्रकाश. (समाप्त) ©️
