धनसंपदा मिळाली म्हणजे मोक्ष आहे का? मग कृतीमान कधी होणार? मी शेषावर पहुडलो आहे. शेषावर पहुडलेले तत्त्व जर झोपलेले असते, तर मग मी अह:र्निश झोपलेलो असतो, नाही का? तर नाही. मला नाही झोप, नाही जागरण ! रात्र नाही, दिवस नाही ! आकार नाही, विकार नाही ! मग मला कसे ओळखाल?
सेवेकरी आपल्या कर्तव्यात जागृत राहिला, तर तो सुखदुःखाची व्याख्या करील असे मला वाटत नाही. “जे प्रणव टाकले, ते कोणाच्या सत्तेने टाकले जातात?” त्याला भंग आहे का? तर नाही. म्हणून त्याला अभंग म्हटले आहे. किती वर्षापासून हे चालत आलेले आहे? ते खोडून काढण्याचे कोणाचे सामर्थ्य आहे का?
ज्या संताने म्हटलेले आहे, “कानी न पडती बोल माझे” | मग बोल कानी पडत नाहीत का? हे लक्षात घ्या.
पूर्व जन्मानुसार सानिध्यात घेतले आहे, ते दुर्लक्ष करण्यासाठी सानिध्यात घेतलेले नाही. आपणच शांती मिळवू शकता. सानिध्यातील ज्योतीना शांती देऊ शकता, पण शंका रहित झाले पाहिजे. दररोज गाऱ्हाणी सांगितली, तर भक्तीचे सार्थक होते का? म्हणून सेवेकऱ्यांनो, कोणीही सुखदुःखाच्या वेगळा नाही. ते सुटलेले नाही. फक्त जो अखंड तत्वात रममाण झाला, त्याला सुखही नाही, दुःखही नाही. अशा तऱ्हेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करा. काहीही त्रास झाला तरी कर्तव्य सोडू नका. (समाप्त)©️
