चौकट मुनी – भक्ती करून घेणारे फार निराळे आहेत आणि कशासाठी भक्ती?
जो मानव सत् पाहण्यासाठी तत्पर झाला आहे, तो काहीही होवो, केव्हाही मागे पुढे पाहणार नाही. ज्याची जितकी उत्कंठा झाली असेल, त्याची ती इच्छा सफल होण्यासाठी, त्याला कशाचेही भान रहात नाही आणि ती सफल झाल्यानंतर दुसरीकडे लक्ष देत नाही. मग अशा सत् भक्ताचा, सत् सेवेकऱ्याचा या कृतीत निमग्न झाला, तो कसा होतो? कोणत्या कारणास्तव होतो? इच्छा काहीही असो, माऊली दयाघन असते. त्या ज्योतीची पाहणी केल्यानंतर समर्थ सुद्धा त्याच्यासाठी राबतात. त्याच्या इच्छेचे फळ त्याला देतात. भक्ती करणारे, करून घेणारी माऊलीच होय.
मात्र स्थूल रूपी मानव पूर्णपणे मायेमध्ये गुरफटला आहे. त्याच्यातून सुटणे कठिण होय आणि त्याच्यातून सुटण्याचा जो प्रयत्न करतो, त्याला माऊली संसारात राहू देत नाही. त्यांना सुद्धा हातभार लावते. परंतु, मानवाने, सेवेकऱ्यानें होता होईल तो मायावी वेष्टण दूर करण्याचा प्रयत्न करावा. जोपर्यंत मानव हे मायावी जाळे तोडू शकत नाही, मग माऊली म्हणते, असे जर आहे, तर जाऊ दे ! ती जर तळमळीने तोडण्याचा प्रयत्न करील, मग मात्र माऊली गप्प बसणार नाही. ती त्याच्या साठी राबत असते. मात्र सूक्ष्म सेवेकरी व स्थूल सेवेकरी यात पुष्कळ फरक आहे. (समाप्त) ©️