भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे, मन ते मजपासोनी जाण । मन माझ्या वेगळे आहे का? त्याची निर्मिती माझ्यापासूनच आहे. पाचवा प्रणववेद प्रगट झाल्यानंतर मन आणि मी, असा दोघांचाच व्यवहार चालू असतो. म्हणजे मनही तेच आणि तेही तेच. त्या ठिकाणी वेगळेपण उरत नाही. म्हणून ते मन त्या सतातच लय करा.
पार्था, तुझे मन तू माझ्यातच लय कर. माझेच चिंतन कर. माझ्या वेगळे तू दुसरे काही पाहू नकोस. मीच या त्रिभुवनात सर्वस्व भरून उरलेलो आहे. आज ना उद्या मी तुला तुझ्या सर्व पापातून मुक्त करीन अन माझ्यातच सामावून घेईन.
आज हे कलियुग आहे. आम्ही कसे बरे तुम्हाला सांगू की तुमचे मन आम्हाप्रत लय करा. पण आम्ही एवढेच सांगू शकतो मन सतमय केल्याशिवाय तुम्हाला पाचवा प्रणववेद पहाता येणार नाही. समजा पाचवा प्रणववेद पाहता आला नाही तरी किमान सद्गुरु दर्शन तरी मिळवा. शुभ्र प्रकाश तरी पाहायचा प्रयत्न करा. वर्तुळ पाहता पाहता ज्योत प्रगट होईल. पण हे सर्वस्व मन अर्पण केल्याशिवाय होऊ शकेल का?
पण आजच्या या कलियुगात सेवेकऱ्याचे मन सद्गुरुमय होते का? आपल्या समक्ष दरबारात येणाऱ्या ज्योतींची उदाहरणे आहेत. दोन तपे दरबारात येऊन देखील ज्योत सांगते माझे काय चुकते ते मला कळत नाही. मग आता अशी ज्योत सद्गुरूंच्या ठायी मनाने लय झाली होती असे म्हणता येईल का?..©️
